विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले तरी सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटू शकलेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी ठरलं होतं, त्याप्रमाणे सत्तेत वाटा हवा अशी शिवसेनेची मागणी असून मुख्यमंत्री पद हा सत्तासंघर्षातील कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर तोडगा निघणं सध्या तरी कठीण वाटत असून दोन ते तीन दिवसांत सत्तापेच न सुटल्यास राष्ट्रपती राजवट अटळ मानली जात आहे. दरम्यान शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे शिवसेना-भाजपाची युती व्हावी यासाठी मध्यस्थी करत आहेत अशी चर्चा सुरु आहे. कारण गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले संभाजी भिडे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजी भिडे गुरुवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांची भेट होऊ शकली नव्हती. संभाजी भिडे कोणतीही पूर्वसूचना न देता मातोश्रीवर आले होते. पण उद्धव ठाकरेंची भेट होऊ न शकल्याने त्यांना मोकळ्या हाती परतावं लागलं.

आणखी वाचा- संभाजी भिडे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट होऊ शकली नाही कारण… 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी संभाजी भिडेंची भेट घेण्यास नकार दिला अशी चर्चा सुरु झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ट्विट करत हा दावा केला. संभाजी भिडे हे मातोश्रीवर संघ आणि भाजपाकडून सत्तास्थापनेसंदर्भात प्रस्ताव घेऊन आले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

पण शिवसेनेकडून स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने भेट झाली नाही, त्यामुळे भेट नाकारली असं म्हणणं चुकीचं आहे असं सांगण्यात आलं. पण संभाजी भिडे यांच्या भेटींमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

आणखी वाचा- भाजपा-शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही : संजय राऊत

राज्यातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर आल्याने गुरुवारच्या राजकीय हालचालींकडे सर्वाचे लक्ष लागले होते. शिवसेना आमदारांची गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका कायम ठेवली. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची चर्चा करताना सत्तेचे समान वाटप आणि मुख्यमंत्री पद प्रत्येकी अडीच वर्षे वाटून घेण्याचा निर्णय झाला होता. या चर्चेनुसारच सत्तेचे वाटप व्हावे, या भूमिकेवर ठाकरे ठाम आहेत. आपल्याला भाजपसोबतची युती तोडायची नाही, फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेचे वाटप व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv pratishthan sambhaji bhide shivsena uddhav thackeray bjp devendra fadanvis maharashtra government sgy
First published on: 08-11-2019 at 13:17 IST