मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात एक दिवसाचे आंदोलन नव्हते. हे भोंगे उतरविले जात नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आहेत. आता मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची भाषा करणाऱ्या ठाकरेंना शिवसैनिकांचाही पाठिंबा मिळत असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी राज ठाकरे यांनी हिंदूंना मशिदीबाहेर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा चालवण्याचे आवाहन केले होते. बुधवारी त्यांनी पुन्हा आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अनेक जुने शिवसैनिक राज ठाकरेंशी सहमत आहेत. राज ठाकरेंनी मशिदींमधून लाऊडस्पीकर खाली उतरवणे आणि रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. यापूर्वी हे मुद्दे स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केले होते. त्यामुळे आता तळागाळातील शिवसैनिकांना राज ठाकरेंच्या भूमिकेशी असहमत दर्शवणे कठीण जात आहे. अशा स्थितीत राज्याच्या महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. “आपण यासाठी असहमत कसे होऊ शकता? बाळासाहेब नेहमी याच मुद्यावर राहिले. राज यांच्याऐवजी आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता,” असे मुंबईतील माजी शाखाप्रमुख म्हणाले. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला ९९ टक्के पाठिंबा असल्याचा दावा काही सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

राज ठाकरेंनी ट्विट केला बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ

बुधवारी राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला. एका कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब ठाकरे मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत बोलत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी, याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे ऐकणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे, असा सवालही राज यांनी केला होता.

मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

दरम्यान, राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न मुंबईमध्ये करण्यात आला. मनसेने घेतलेल्या पवित्र्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली. दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी व त्यांच्या चालकाविरोधात शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sainiks support raj thackeray over loudspeaker row abn
First published on: 05-05-2022 at 08:22 IST