भाजप व सरकारविरोधात शिवसेना अधिक आक्रमक होणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चेही काढावेत, अशाही सूचना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या.

उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुख, आमदार, शिवसेनेचे मंत्री आदींच्या उपस्थितीत शिवसेनाभवनात बुधवारी बैठक घेतली. त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी भाजपकडून शिवसेनेला मिळत असलेल्या वागणुकीचा उल्लेख केला. विधानसभा निवडणुकीत २५ वर्षे असलेली युती तोडली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी युती केली नाही. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

भाजप ऐनवेळेपर्यंत चर्चेत अडकवून युती होवू देत नाही. त्यामुळे काहीही करुन मुंबई महापालिकेवर शिवसेनेने स्वबळावरच सत्ता मिळवावी. जनतेचीही तशीच इच्छा असल्याचे या नेत्यांनी बैठकीत सांगितले.

शेतकऱ्यांच्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक होण्याचे ठाकरे यांचे पक्षाच्या कार्यकर्त्यांना निर्देश आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोचली नसून अनेक उपाययोजना करण्यात प्रशासन निष्क्रिय आहे. सत्तांतर होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील, तर ते नुसते पहात बसण्यापेक्षा अगदी मोर्चे काढूनही आवाज उठवावा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.