दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या(डीडीसीए) भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आरोप करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. केजरीवाल यांचे राजकारण म्हणजे एक बुडबुडा असून, तो फुटायला वेळ लागणार नाही, अशी टीका शिवसेनेच्या सामनाया मुख्यपत्रातील अग्रलेखातून करण्यात आली आहे. अरुण जेटली आणि केजरीवाल असा राजकीय सामना सध्या रंगला असून, हा अनेकांसाठी बिनपैशाचा तमाशा झाल्याचे सांगत  वाटेल ते आरोप करण्यात केजरीवाल यांचा हात कोणीच धरू शकत नाही, असा घणाघात शिवसेनेने केला आहे. शिवाय डीडीसीए भ्रष्टाचार प्रकरणात शिवसेनेने जेटली यांची पाठराखण देखील केली आहे. केजरीवाल यांनी याआधीही गडकरींविरोधात मोहीम उघडून त्या प्रकरणात तेल ओतले. आज जेटली यांच्या बाबतीत तेच घडते आहे. मागच्या संसद अधिवेशनाच्या वेळी मंत्री सुषमा स्वराज यांच्या विरोधात काहूर माजवले गेले व त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाही सुषमा स्वराज यांना अडचणीत आणून बदनाम करणारे आतलेच आहेत, असे बोलले गेले व आता जेटली यांच्या ताज्या प्रकरणातही हा आतलाच आवाज केजरीवाल यांच्या मुखातून ढेकर दिल्यासारखा बाहेर पडला आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.