पुतळ्यावरील छत्रीसाठी सरकारकडून १२ लाख रुपये मंजूर

नरिमन पॉइंट परिसरातील कूपरेज उद्यानाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता, माहिती फलक बसविणे आणि धातूची छत्री उभारण्याचे काम पालिकेने हाती घेतले असून यासाठी २१ लाख रुपये खर्च येणार आहे. उभारण्यात येणाऱ्या छत्रीसाठी १२ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. मात्र ही सर्व कामे पालिकेमार्फत करण्यात येत असल्याने ती पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लोकार्पण महापौरांच्या हस्ते व्हावे, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे या मुद्दय़ावरून भविष्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

कूपरेज येथील सहा फूट उंचीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्यात यावी अशी मागणी आंबडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांकडून पूर्वीपासून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत पालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर सात फूट परिघाची ३.५ फूट उंचीची धातूची छत्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाची माहिती देणारा, तसेच संविधानाची प्रस्तावना असलेले दोन धातूची फलक पुतळ्याजवळ उभारण्यात येणार आहेत. तसेच या पुतळ्याची स्वच्छताही करण्यात येणार आहे. या कामासाठी २१ लाख रुपये खर्च येणार आहे. गेल्या ६ डिसेंबरपूर्वी ही कामे पूर्ण करावयाची होती. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे ही कामे वेळेवर करता आली नाहीत. आता १४ एप्रिलपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स’ााद्री अतिथीगृहामध्ये सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील छत्रीसाठी लागणारे १२ लाख रुपये राज्य शासनातर्फे देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण सोहळ्यात त्याचे श्रेय लाटण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून १२ लाख रुपये देण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांकडून करण्यात येऊ लागला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशी निगडीत सर्व कामे पालिकेमार्फत करण्यात येत आहेत. पालिकेने निविदा मागवून ही कामे कंत्राटदाराला दिली आहेत. त्यामुळो लोकर्पण सोहळा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पार पडायला हवा, असे मत सभागृह नेते यशवंत जाधव यांनी व्यक्त केले.