नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाणार प्रकल्प कोकणात होऊ देणार अशी शिवसेनेची भूमिका कायम आहे. पण तो प्रकल्प महाराष्ट्रातील इतर ठिकाणी नेता येईल. स्थानिकांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही, असा शब्द देऊनही मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्री खोटे बोलले व त्यांनी कोकणच्या जनतेला मूर्ख बनवले आहे. लोकांचा असाच विरोध होत राहिला तर नाणार रिफायनरी गुजरातला जाईल, अशी धमकी फडणवीस देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ही धमकी दिली आहे की त्यांनी कुणाची चमचेगिरी केली आहे, असा अप्रत्यक्षरित्या टोला त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरून टीका केली. जो उठतोय तो महाराष्ट्रालाच अक्कल शिकवतोय. आता जो कोणी उठतोय तो कोकणातील निसर्ग उद्ध्वस्त करायला निघाला आहे, हे नाणार प्रकल्पाने पुन्हा दाखवले आहे. नाणार प्रकल्पामुळे कोकण भूमीची राखरांगोळी करू नका ही सेनेची भूमिका असतानाही केंद्र सरकारने स्थानिक जनतेचा विरोध डावलून अरबी कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. जहाज बांधणीच्या प्रकल्पांना समुद्रकिनारी चांगली उभारी घेता येईल. गोव्यात ज्याप्रमाणे फार्मास्युटीकल उद्योगांनी चांगले बस्तान बसवले आहे. त्याप्रमाणे अशाप्रकारच्या उद्योगांना कोकणातही हात-पाय पसरता येतील, पण समुद्रकिनारे व हवा प्रदूषित करणारे विषारी प्रकल्प कोकणच्या माथी मारले जात आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

नाणार प्रकल्पासाठी समुद्राचे पाणी न घेता कोयनेच्या अवजलाचा वापर करता येईल काय याची चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्रात इतरत्रदेखील जलविद्युत प्रकल्प आहेत. जर कोयनेच्या अवजलाचा वापर रिफायनरीसाठी करण्याचा अभ्यास सुरू असेल तर या प्रकल्पांबाबतही तसा अभ्यास करावा असेही शिवसेनेने सुचवले असून मुख्यमंत्र्यांनी गुजरातच्या धमक्या न देता हा प्रकल्प महाराष्ट्रातच इतरत्र नेता येईल. विदर्भ अथवा मराठवाड्य़ात हा प्रकल्प न्यावा. मुख्यमंत्र्यांचे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे स्वप्नही एका पावलाने पुढे जाईल.

शेती, पर्यटन, बागायती, मासेमारी हा कोकणवासीयांचा परंपरागत व्यवसाय आहे. तो संपवणारे विषारी प्रकल्प आमच्या छाताडावर ठोकू नका, एवढेच आमचे सध्या हात जोडून सांगणे आहे. विरोध होत राहिला तर नाणार रिफायनरी गुजरातला जाणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाणार प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्र्यांना अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन वाटली काय? मुख्यमंत्र्यांनी संयमाने वागावे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत याचे भान ठेवून बोलावे. मुख्यमंत्र्यांना मुंबई व महाराष्ट्रातील उद्योगांची काळजी आहे असे वाटले असते. दुसरे असे की, नाणारसारखे प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याचे इशारे कसले देता? असा सवाल करत हा प्रकल्प विदर्भात न्या. तेथेही मोठे प्रकल्प येऊ द्या, असा सल्लाही शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena chief uddhav thackeray criticized on cm devendra fadnavis for nanar refinery project
First published on: 16-04-2018 at 08:07 IST