देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश यात्रेवरून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यास्पद राजकारण सुरू असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. वाजपेयी हे अजातशत्रू होते. ते भाजपा, संघ परिवाराचे होते. संपूर्ण देश त्यांचा होता वते देशाचे होते. पण सध्या त्यांच्या अस्थिकलशावरून होणार हास्यास्पद राजकारण कोणालाच शोभणारे नाही. भाजपात बुजुर्ग नेत्यांना महत्व राहिलेले नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्व मिळत असल्याचा टोलाही लगावला आहे. सध्या भाजपातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मिळत असलेल्या वागणुकीवरही या माध्यमातून सेनेने भाजपावर शरसंधान साधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अटलजींचे अस्थिकलश दर्शन व विसर्जन ज्या गांभीर्याने तसेच श्रद्धेने व्हायला हवे होते तसे घडताना दिसले नाही. अस्थिकलश हाती घेऊन विजयी ट्रॉफी उंच करावी तसे फोटोसेशन काही ठिकाणी करण्यात आले. विश्वचषक जिंकल्याचे हावभाव मंत्र्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. निधनानंतर देशात दु:खाचे वातावरण निर्माण झाले असताना त्याचा राजकीय व्यापार सुरू असल्याचे मत वाजपेयींच्या नातेवाईकांनी व्यक्त केले होते, हे अत्यंत गंभीर असल्याची खंत शिवसेनेने आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून व्यक्त केली आहे.

काय म्हटलंय शिवसेनेने..
* नेत्यांचे मोठेपण हे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याने ठरत नाही. ते तर एक राजशिष्टाचाराचे कर्तव्यच आहे. अटलबिहारी वाजपेयींनी कधी द्वेषाचे आणि सूडाचे राजकारण केले नाही. विरोधकांच्या मुंडक्या उडवण्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला नाही.

* माणूस आपल्यातून निघून जातो तो शरीराने, पण त्याचा विचार पुढे नेणे हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरते. आधी अंत्यसंस्कार मग त्या नेत्यांच्या अस्थिकलशांच्या उत्सवी मिरवणुका या मान्य केल्या तरी त्यांच्या विचारांचे काय?

* अटलजींचे अस्थिकलश दर्शन व विसर्जन गांभीर्याने तसेच श्रद्धेने झाले नाही. अपवाद वगळता अस्थिकलश दर्शन व प्रदर्शन म्हणजे एक राजकीय रंगतदार कार्यक्रम साजरा करावा तसाच झाला. अस्थिकलश हाती घेऊन विजयी ट्रॉफी उंच करावी तसे फोटोसेशन काही ठिकाणी करण्यात आले.

* अटलजींचा अस्थिकलश हाती घेऊन लोक खदाखदा हसत होते. काहींनी अटलजींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी काढण्याचा पराक्रम केला. या सर्व प्रकारांमुळे अटलप्रेमाचे मुखवटे गळून पडले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूने देशावर शोककळा पसरली. अटलजींचे नेतृत्व म्हणजे प्रामाणिकपणाचे शिखर होते. त्यात भेसळ नव्हती. त्यांच्या पोटात एक, तर ओठांवर दुसरे असला प्रकार नव्हता.

* अटलबिहारी वाजपेयींवर देशाने पंडित नेहरूंइतकेच प्रेम केले. त्यामुळे त्यांचे अस्थिकलश दर्शन व विसर्जन एकपक्षीय न ठेवता सर्वपक्षीय म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून व्हायला हरकत नव्हती. सर्वच राजकीय पक्षांनी अटलजींचा अस्थिकलश स्वीकारून सन्मानाने आणि श्रद्धेने विसर्जित केला असता. पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी, महाराष्ट्रात शिवसेना, ओडिशात नवीन पटनाईक, पंजाबात अकाली दल यांना सोबत घेता आले असते. यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही सामील झाले असते व अटलजींच्या लोकमान्य महानतेचे विराट दर्शन जगाला घडले असते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena chief uddhav thackeray slams on bjp for ex pm atal bihari vajpayees asthi kalash yatra
First published on: 27-08-2018 at 07:43 IST