नाना पटोले यांची मागणी
मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यांसह केलेले आरोप गंभीर आहेत. त्यातील सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईतील काही विकासकांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप झाला आहे. ईडीने हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले का, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ईडीने मुंबईतील काही विकासकांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचाआरोप राऊत यांनी केला आहे. ईडीने हे पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठविले का? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढे धाडस करू शकत नाहीत, असे पटोले म्हणाले.