महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली महायुतीतील धुसफूस मंगळवारी अधिकच तीव्र झाली. या भेटीवर तीव्र नाराजी प्रकट करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत भाजपची कानउघाडणी केली. त्यानंतर ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी आणि भाजप शिवसेना युतीच अभंग आहे, हे पटविण्यासाठी वरिष्ठ भाजप नेत्यांनी मंगळवारी शिवसेनेसाठी पुन्हा ‘नमो-नमो’ चा सूर आळविला. नरेंद्र मोदी यांनीही रात्री दूरध्वनीवरून उद्धव यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्रात भाजपमध्ये निर्णय कोण घेतो आणि महायुतीच्या विरोधात उमेदवार उतरवून मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या मनसेचा पाठिंबा निवडणुकीनंतर घेणार का, असे स्पष्ट सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपला केले. रालोआविरोधात उतरून पंतप्रधानपदासाठी मात्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाचा पाठिंबा घेणे ही केजरीवाल नीती झाली, असे त्यांनी भाजपला सुनावले.
 ज्यांच्याकडे मते नाहीत, मुद्दे नाहीत तेच मोदींचा मुखवटा घालून मते मागत आहेत. मान या ना मान, मै तेरा मेहमान, अशी त्यांची अवस्था आहे, या शब्दांत त्यांनी राज यांची खिल्ली उडवली.
गेल्या काही दिवसांत मनसे आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याने शिवसेनेत संताप आहे. या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात सेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखांसह सर्व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ही पत्रकार परिषद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आधारित असून एका वैचारिक बैठकीवर प्रदीर्घ काळापासून ही युती आहे. गोपीनाथ मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे एक उत्तम वातावरण दोन्ही पक्षांत निर्माण झाले असताना मध्येच कोणीतरी येऊन काहीतरी बोलतो आणि युतीत बिघाड करतो.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

उद्धव यांचे टोले
* कोण-कुठल्यातरी ‘पूर्ती’साठी महायुतीत बिब्बा घालण्याचे काम करतोय
* ज्यांच्याकडे मते नाहीत, मुद्दे नाहीत तेच मोदींचा मुखवटा घालून मते मागत आहेत
* ‘मान या ना मान, मै तेरा मेहमान’, अशी त्यांची अवस्था आहे
* उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची जगाची रीतच आहे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena says ties with bjp strong maharashtra bjp leader meets uddhav thackeray
First published on: 12-03-2014 at 02:53 IST