मधु कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवेसना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-वंचितचे जागावाटपाचे गणित नीट जमले तर, भाजपपुढे आव्हान उभे करू शकतात. त्याचबरोबर ठाकरे-आंबेडकर युती दहा वर्षांपूर्वी शिवशक्ती-भीमशक्तीची पायाभरणी करणार केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या राजकीय अस्तित्वाचीही कसोटी घेणारी ठरणार आहे.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी दादर येथील आंबेडकर भवनमध्ये येऊन प्रकाश आंबेडकरांसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नव्या युतीची घोषणा केली आहे. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्वत: राजगृहावर जाऊन प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर युतीची चर्चा केली होती, त्यावेळी एकसंध काँग्रेस आणि एकीकृत रिपब्लिकन युती झाली होती व निवडणुकीचे निकाल बदलून टाकले होते. उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर आधी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ आणि आता आंबेडकर भवनला येणे, त्यातून नव्या राजकीय समीकरणाबाबत आम्ही किती गंभीर आहोत, हे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना, मतदारांनाही आणि सहानुभूतीधारकांना दाखविण्याचा प्रयत्न होता. राजकीयदृष्टय़ा असा संदेश देणे महत्त्वाचे असते, ठाकरे-आंबेडकर यांनी तो पहिल्याच जाहीर पत्रकार परिषदेतून दिला आहे.

उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांनी आम्ही एकत्र का आलो आहोत, याबद्दलची वैचारिक व राजकीय भूमिका मांडली. त्याचा राजकीय परिणाम किती व कसा होईल, हे पुढे होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल. शिवसेनेत फूट पडल्यानंतर, ठाकरे यांच्या पक्षाची नेमकी राजकीय ताकद किती हे मुंबई महापालिका निवडणुकीत समजणार आहे. साधारणपणे भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष शक्यतो मुंबई महापालिकेची निवडणूक स्वंतत्रपणे लढण्याची शक्यता आहे. फरक एवढाच असेल , भाजपबरोबर शिंदे गट व आठवले गट राहतील.
शिवेसना-काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले तरी, तेवढा फार परिणाम होणार नाही, कारण राष्ट्रवादीची मुंबईतील राजकीय ताकद मर्यादित आहे.

ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करण्यामागे ही सारी राजकीय गणिते असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरे असे की राज्यस्तरावर काही पक्षांच्या आघाडय़ा असल्या तरी, स्थानिक स्वराज्य संघांच्या निवडणुकांमध्ये वेगळी भूमिका घेतली जाते, हेही गृहीत धरले जाते, त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तरी, त्याचा राज्यस्तरीय आघाडीच्या एकजुटीवर काही परिणाम होणार नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की, उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक वंचित आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत जी पडझड झाली आहे, ती वंचितला बरोबर घेऊन भरून काढण्याचाही ठाकरे यांचा हा प्रयत्न दिसतो आहे.

शिवसेनेबरोबर युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची मुंबईत ताकद किती असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या बदललेल्या हिंदूत्ववादाबरोबरच लोकशाहीवादी व संविधानवादी भूमिकेचे आंबेडकरी अनुयायांकडून स्वागत होत आहे. अस्वस्थ आंबेडकरी समाज वंचितच्या माध्यमातून शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला तर, मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी आक्रमक झालेल्या भाजपपुढे शिवसेना-वंचित आघाडी युती आव्हान उभे करू शकते. प्रकाश आंबेडकर यांनी या आधीच सांगितले आहे की, जागावाटप हा काही कळीचा वा अडचणीचा मुद्दा ठरणार नाही. तसे झाले तर, शिवसेना-वंचित युतीचे राजकीय परिणाम वेगळे दिसतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena vanchit challenge to bjp ramdas athawale leadership amy
First published on: 24-01-2023 at 00:17 IST