येत्या पावसाळ्यात शीव स्थानक आणि धारावी परिसर जलमय होण्याच्या समस्येतून सुटका होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेने या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यजल वाहिन्यांची कामे हाती घेतली आहेत.दरवर्षी पावसाळ्यात शीव स्थानक परिसर जलमय होतो. मुंबई महानगरपालिकेचे पूर्व उपनगरात पावसाच्या पाण्याचा उपसा करणारे एकही उदंचन केंद्र नाही. त्यामुळे या परिसरात थोडासा पाऊस पडल्यानंतरही पाणी साचते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने येथील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याची कामे हाती घेतली आहेत.
हेही वाचा >>>मुंबई: अनामत रक्कमेसह सर्वात आधी येणाऱयास थेट घर
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या शीव – माहीम जोडरस्त्यावरील बॉक्स ड्रेन व धारावीत ९० फूट रस्त्यावर मायक्रो टनेलिंग प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी या कामांची गुरुवारी पाहणी केली. मायक्रो टनेलचे काम प्रगतिपथावर असून बॉक्स ड्रेनचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांवर समांतरपणे चार विविध संस्था कार्यरत आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर यंदा पावसाळ्यात शीव रेल्वे स्थानक परिसर आणि धारावी परिसराला पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>शिवछत्रपती पुरस्कार विजेता खो-खोपटू राजू द्रविडचे निधन
समुद्राला भरती आल्यानंतर पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी धारावी येथे लघू उदंचन केंद्र उभारण्यात येणार आहे. पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय आणि कांदळवन कक्ष यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या केंद्राच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. हे लघू उदंचन केंद्र पुढील ६ ते ८ महिन्यांत उभारण्यात येणार आहे. २०२४ च्या पावसाळ्यापूर्वी ते कार्यान्वित करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. या लघू उदंचन केंद्रामुळे पावसाळ्यात भरतीच्या काळातही पूर नियंत्रण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल, असा दावा महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.