पुणे : खो-खो, कबड्डी अशा रांगड्या खेळाबरोबरच ॲथलेटिक्समध्येही छाप पाडणारा अष्टपैलू खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेता राजेंद्र द्रविडचे प्रदिर्घ आजाराने राहत्या घरी गुरुवारी निधन झाले. ते ७० वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी अर्जुन पुरस्कार विजेती सुरेखा द्रविड आणि दोन मुले असा परिवार आहे.
क्रीडा जगतात द्रविड ‘राजू’ म्हणूनच ओळखला जात होता. शालेय जीवनात लंगडीखेळापासून मैदानाशी जोडली गेलेली त्याची नाळ अखेरपर्यंत कायम होती. खो-खोमध्ये त्याने १९६७ ते १९८३ अशी १६ वर्षे आपली कारकीर्द घडवली. या दरम्यान त्याने कबड्डी आणि ॲथलेटिक्समध्येही आपली छाप पाडली होती. विशेष म्हणजे १९८० मध्ये राजूने भारताचा तेव्हाचा अव्वल धावपटू आदिल सुमारीवालाला हरवून राष्ट्रीय स्पर्धेत १०० मीटर धावण्याची शर्यत जिंकताना वेगवान धावपटूचा किताब मिळविला होता. राजूला १९७७-७८ मध्ये राज्य शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविले होते. राजूने महाविद्यालयीन कारकिर्दीत पुणे विद्यापाठीच्या खो-खो, कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.