मुंबई : आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मोहिमांवर आधारित, तसेच मावळ्यांची प्रेरणादायी कहाणी सांगणाऱ्या अनेक कलाकृतींची निर्मिती झाली आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीवर आणि विविध धोरणांवर प्रकाश टाकणारे ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे मराठी नाटक पुन्हा रंगभूमीवर अवतरत आहे. या नाटकाचे प्रयोग सप्टेंबरपासून सुरू होत असून बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर येथे शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रयोग सादर होणार आहे.

अद्वैत थिएटर प्रकाशित, रंगमळा प्रस्तुत आणि विद्रोही शाहीरी जलसाच्या सहकार्याने सादर होणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकातून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रजाहितदक्ष धोरण, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, सहिष्णुता, अर्थनियोजन आणि स्त्रियांकडे बघण्याचा आदराचा दृष्टिकोन आदी विविध महत्त्वपूर्ण मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

अद्वैत थिएटर प्रकाशित, रंगमळा प्रस्तुत आणि विद्रोही शाहीरी जलसाच्या सहकार्याने सादर होणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाचे लेखन राजकुमार तांगडे यांनी केले असून कैलाश वाघमारे व संभाजी तांगडे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर संकल्पना, गीत व संगीत संभाजी भगत यांचे असून निर्माते राहुल भंडारे आहेत. तसेच कैलाश वाघमारे, संभाजी तांगडे, मीनाक्षी राठोड, राजकुमार तांगडे, प्रवीणकुमार डाळिंबकर, डॉ. अश्विनी भालेकर आदी कलाकार आहेत.

‘सध्याची परिस्थिती पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, हेच जाणून ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू करीत आहोत. आपल्याला भविष्यात चांगली युवा पिढी घडवायची असेल, तर हे नाटक अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या नाटकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला असून ही मूल्ये प्रेक्षकांमध्ये रुजणे गरजेचे आहे. या नाटकाचे आतापर्यंत जवळपास ८०० प्रयोग झाले असून येत्या काळात १ हजार प्रयोग पूर्ण करण्याचा मानस आहे’, असे निर्माते राहुल भंडारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.