मुंबई : देशातील एकूण बियाणांच्या पुरवठ्यापैकी ७० टक्के बियाणे खासगी कंपन्यांकडून पुरविले जातात. पण, दरवर्षी बियाणांची उगवण क्षमता कमी असणे, बियाणे अजिबात न उगवण्याच्या घटना घडतात. निकृष्ट बियाणांचा पुरवठा करणाऱ्या खासगी बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई केला जाईल. त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवा बियाणे आणि कीडनाशके कायदा आणला जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

मुंबईत आयोजित आशियाई सीड काँग्रेस २०२५ चे उद्घाटन शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी आशिया पॉसिपिक सीड असोशिएशनचे अध्यक्ष कोह टेक वाह, नॅशनल सीड असोशिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष एम. प्रभाकर राव आदी उपस्थित होते.

देशात आजही शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. देशाची अन्नधान्यांची गरज भागवून जगाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शेतीमालाची निर्यात केली जाते. देशात होणाऱ्या एकूण बियाणांच्या पुरवठ्यापैकी सुमारे ७० बियाणांचा पुरवठा खासगी कंपन्यांकडून केला जातो. पण, प्रत्येक हंगामात बियाणे कमी उगवणे आणि बियाणे अजिबातच न उगविण्याचे प्रकार घडतात. शेतकऱ्याचा एक हंगाम वाया गेल्यास पुढील पाच वर्षांचे आर्थिक गणित बिघडते. त्यामुळे निकृष्ट बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही चौहान यांनी दिला.

हवामान बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे हवामान बदल सहनशील, संकरीत वाणांच्या संशोधनावर भर देण्याची गरज आहे. केंद्र सरकार सर्व जबाबदारी खासगी बियाणे कंपन्यांवर टाकणार नाही. सरकार आपला वाटा उचलेलं. त्या बाबत चर्चा करण्यासाठीच मी इथे आलो आहे. बियाणे आणि कीडनाशके कायद्यांबाबत तुमच्या काही सूचना असतील तर सांगा. पण, दर्जेदार बियाणांबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. जणुकीय सुधारित (जीएम) बियाणांच्या संशोधनावर भर देण्याची गरज आहे.

आजही अनेक खासगी कंपन्या संशोधनावर खर्च करीत नाहीत. पण, संशोधनावर खर्च करण्याची गरज आहे. कंपन्यांनी बियाणांची चाचणी केल्यानंतर सरकार पुढील तीन वर्षे बियाणांची चाचणी करून बियाणे बाजारात आणते. पण, आम्ही कंपन्यांकडून चाचणी झालेले बियाणे थेट बाजारात आणण्याची तरतूद करू शकतो, अशी ग्वाहीही शिवराज सिंह चौहान यांनी दिली.

बियाणांच्या किंमती आटोक्यात ठेवा

खासगी कंपन्यांच्या बियाणांना बाजारात मागणी असते. शेतकऱ्यांचाही खासगी कंपन्यांवर विश्वास आहे. पण, दरवर्षी बियाणांचे दर वाढतच आहेत. संकरीत बियाणे दरवर्षी विकत घ्यावे लागते. कीडनाशके आणि रसायनांचा वापर ही वाढत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाचे उत्पादन वाढत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. पालेभाज्यांच्या बियाणांचे दर अवाढव्य आहेत. त्यामुळे कंपन्यांनी बियाणांचे दर आटोक्यात ठेवण्याची गरज आहे, अशी सूचनाही चौहान यांनी केली.