गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ चर्चेत आला आहे. भाजपाकडून दहीहंडीच्या निमित्ताने वरळीच्या जांबोरी मैदानात शक्तीप्रदर्शन केल्याचं बोललं जात असतानाच हा कुणाचाही गड नाही, असं म्हणत भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट आदित्य ठाकरेंना खुलं आव्हानच दिल्याचं बोललं जात आहे. एकीकडे भाजपानं वरळीवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत असताना दुसरीकडे शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी मात्र भाजपाच्या या प्रयत्नांना फारसं गांभीर्याने घेत नसल्याचंच दर्शवणारी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांमध्ये वरळी हा राजकीय विश्लेषकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
नेमकं काय घडलं?
वरळीच्या जांभोरी मैदानात भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासोबतच हंडीचे थर लावून शिवसेनेच्या सत्ताकारणाचे थर कोसळवणार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला.“भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे…आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय..भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत…लवकरच मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत ‘करुन दाखवतील’. आमचं ठरलंय”, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली होती.
त्यावर बोलताना आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर या दोन्ही नेत्यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं होतं. ते वरळीत येत असतील, तर त्यांचं स्वागतच आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. तर “आशिष शेलार यांनी त्यांचे किमान ५० टक्के पदाधिकारी तरी वरळीमध्ये करावे. गेल्या वेळी ते महानगरपालिकेत स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. वरळीत त्यांना खातंही उघडता आलं नाही”, अशा शब्दांत सचिन अहिर यांनी टोला लगावला होता.
दरम्यान, वरळीत भाजपाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असताना आदित्य ठाकरेंनी त्यावरून खोचक शब्दांत टोला लगावला आहे. भाजपा वरळीत तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे, अशी विचारणा टीव्ही ९ च्या कार्यक्रमात केली असता आदित्य ठाकरे म्हणाले, “फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोलाच घेरण्याचा प्रयत्न होतो, बाकी कुणाला नाही. वरळीत मला घेरण्याचा प्रयत्न होत असेल, तर आनंदच आहे.”
वरळी नेमका कुणाचा गड? सेना की भाजपा? आशिष शेलार आणि आदित्य ठाकरेंमध्ये रंगला कलगीतुरा!
शिंदे गटाला टोला!
दरम्यान, यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटालाही टोला लगावला आहे. “ब्रिटनमध्ये पंतप्रधान जाहीर झाले हे बरं झालं. नाहीतर यांनी तिथे प्रतिपंतप्रधान जाहीर केले असते यांचे”, असं ते म्हणाले. “सत्ताधारी ४० गद्दार आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे केले होते हे आम्ही पाहिलं. प्रामाणिकपणे काम करत असलेल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय.संपत्ती, वारस, वारसा हे सगळं त्यांच्या मनात आहे. आम्ही माझ्या आजोबांनी दाखवलेल्या वारशावर चाललोय. माझ्या आजोबांनी कधीही झेंडा बदलला नाही, रंग बदलला नाही”, असंही ते म्हणाले.