छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरुन शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे आणि कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांनी सातारा पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.
दि. ८ आणि ९ तारखेला पाटणमध्ये मराठी साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा पवार होत्या. तर रावसाहेब कसबे हे प्रमुख वक्ते होते. पण दोघांनीही शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याचा दावा शंभूराजे देसाई यांनी केला आहे.
पाटण येथे झालेल्या विभागीय साहित्य संमेलनात रावसाहेब कसबे आणि प्रज्ञा पवार यांनी राष्ट्रपुरूषांबाबत अवमानकारक उल्लेख केल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. परंतु त्यांच्याकडून तीन दिवसांत प्रतिसाद न आल्याने पोलिसांकडे तक्रार केल्याचे आमदार देसाई यांनी सांगितले.
रावसाहेब कसबे आणि प्रज्ञा पवार यांच्या भाषणाचे ऑडिओ आणि व्हिडिओ फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्याची पडताळणी करून समाजाला दुखावणारे वक्तव्य त्यात असेल तर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पोलीस अधिक्षकांनी दिली.
कार्यक्रमानंतर माथेफिरू जमाव कसबे यांच्याकडे आला व त्यांनी राष्ट्रपुरूषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असून माफी मागावी अशी मागणी केली. यावर कसबे यांनी आपण ही भुमिका वर्षानुवर्षे मांडत असून तुमच्या अज्ञानामुळे तुम्हाला जर समजली नसेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले अशी माहिती प्रज्ञा पवार यांनी माध्यमांना दिली. तिथे तणावपूर्ण स्थिती होती. संमेलनाला गालबोट लागू नये व संयोजकांनी विनंती केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणाहून निघाल्याचे स्पष्टीकरण पवार यांनी दिले.
