महापौर महाडेश्वर यांच्याविरोधात तृप्ती सावंत यांचा अर्ज
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शुक्रवारी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून (१७६) शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आणि गेले काही दिवस महापौरांच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला. मात्र वांद्रे पूर्वमधील शिवेसनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकवत महापौरांच्या विरोधात ठाकल्या असून त्यांनीही शुक्रवारी याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. ‘मातोश्री’च्या अंगणातच बंडाचा झेंडा फडकल्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक अशी ओळख असलेले बाळा सावंत यांना मागील विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघातून ते विजयी झाले होते. मात्र कालांतराने त्यांचे निधन झाले. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. बाळा सावंत यांनी जपलेल्या मतपेढीच्या जोरावर त्या निवडून आल्या होत्या. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचा फारसा संपर्क नव्हता. पदाधिकाऱ्यांमधील नाराजीमुळे या वेळी त्यांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागले. या मतदारसंघातून विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे तृप्ती सावंत अस्वस्थ झाल्या होत्या.
शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये वांद्रे पूर्वमधील उमेदवाराच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी काढलेल्या मिरवणुकीत तृप्ती सावंत सहभागी झाल्यामुळे अनेक शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शिवसेनेने वांद्रे पूर्वमधून महाडेश्वर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. विश्वनाथ महाडेश्वरांनी उमेदवारीचा अर्ज भरला. तृप्ती सावंत यांनीही याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये गोंधळ उडाला. काँग्रेसतर्फे बाबा सिद्धीकी यांचे झिशान सिद्धीकी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात सुमारे २ लाख ४३ हजार मतदार आहेत. त्यापैकी ८५ हजार मतदार मुस्लीम आहेत.
राजूल पटेल यांचे बंड
’ शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेविका राजूल पटेल यांनी बंड पुकारत शुक्रवारी वर्सोवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार भारती लव्हेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राजूल पटेल यांच्या बंडामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. या मतदारसंघात मुस्लीम आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या अधिक आहे. या दोन्ही समाजामध्ये राजूल पटेल यांचा चांगला संपर्क आहे.
’ अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेने रमेश लटके यांना उमेदवारी दिली आहे. रमेश लटके यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राजूल पटेल यांनी बंड करीत भारती लव्हेकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
भांडुपचे विद्यमान आमदार नाराज
भांडुपमध्ये नगरसेवक रमेश कोरगावकर यांना उमेदवारी अर्ज मिळाल्याने विद्यमान आमदार अशोक पाटील नाराज आहेत. शुक्रवारी कोरगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काढलेल्या पदयात्रेत पाटील अनुपस्थित होते. गुरुवारी रात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिल्यानंतर पाटील यांनी समर्थकांसह तातडीने मातोश्री गाठले. ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्यांना ठाकरेंनी भेट नाकारली.