Sanjay Gaikwad Blames South Indians: “महाराष्ट्रातल्या लोकांच्या आरोग्याशी दक्षिणेकडच्या लोकांनी खेळ मांडला आहे”, असं म्हणत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी नव्याने केलेलं विधान चर्चेत आलं आहे. आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून समज दिल्यानंतर आपण त्यांचा गैरसमज दूर करू, असं गायकवाड म्हणाले आहेत. तसेच, महाराष्ट्रात डान्स बार, लेडिज बार शेट्टी लोकांचे असल्याचंही संजय गायकवाड म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी रात्री संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. जेवणाचा दर्जा चांगला नसल्याची त्यांची तक्रार होती. कर्मचाऱ्याला जाब विचारतानाच संजय गायकवाड हातातल्या पिशवीत आणलेल्या डाळीचा वास सगळ्यांना घ्यायला सांगत होते. गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध विरोधकांनी केला आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील गायकवाड यांना समज दिली आहे. यानंतर बुधवारी FDA नं कॅन्टिनमधील कंत्राटदार अजंता केटरर्सचा परवाना रद्द केला आहे.
काय म्हणाले संजय गायकवाड?
संजय गायकवाड यांनी या संपूर्ण प्रकरणात आता मराठी-अमराठी मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रातल्या लोकांच्या आरोग्याशी साऊथ इंडियन लोकांनी खेळ मांडला आहे. मला पोटाचा त्रास आहे. जरा जेवणात बदल झाला तर काय त्रास होतो माझं मला माहिती. त्यामुळे मी वारंवार मागणी करत होतो की हे सगळं बंद झालं पाहिजे. महाराष्ट्रात डान्स बार, लेडिज बार हे सगळे या शेट्टी लोकांचेच आहेत. महाराष्ट्राची संस्कृती नष्ट करण्याचं काम या लोकांनी केलं. महाराष्ट्र कलंकित करण्याचं काम केलं. महाराष्ट्राची तरुणाई बरबाद करण्याचं काम या लोकांनी केलं. आता आमचं आरोग्य खराब करण्याचं काम करत आहेत”, असं संजय गायकवाड यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
“आता मराठी माणसाला परवाना द्या”
“या केटरर्सचा परवाना रद्द झाल्यानंतर आता तो मराठी माणसाला मिळाला पाहिजे. जेणेकरून महाराष्ट्रातील लोकांचं रोजचं जेवणं काय असतं हे त्याला माहिती असेल. त्याचे कर्मचारीही माणुसकीने लोकांशी बोलतील. कारण आधीच्या केटररचे कर्मचारी लोकांशी व्यवस्थित बोलत नव्हते. त्यांची वैद्यकीय तपासणी, नोंदणी असं काहीही नव्हतं. एखादा गुन्हा घडला, तर त्याचा पत्ताही लागणार नाही”, अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे.
“योग्य वेळी मी योग्य भूमिकाच घेत आलो आहे. चुकीच्या मार्गाने जाण्याची वेळ आमच्यावर कुणी येऊ देऊ नका, एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतोय”, असंही संजय गायकवाड म्हणाले.
वरीष्ठांचा गैरसमज दूर करणार – संजय गायकवाड
दरम्यान, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंनी समज दिल्याबाबत विचारणा केली असता त्यांचा गैरसमज दूर करणार असल्याचं संजय गायकवाड म्हणाले. “आमदारांनी असं करायला नको हे मला माहिती आहे. पण मला हे असं करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांची माझ्यावर नाराजी असेल तर मी त्यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करेन. मी आता लिखितमध्ये सगळं देणार आहे. त्याचबरोबर भेटून तोंडीही बाजू मांडणार आहे”, असं ते म्हणाले.