महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास नकार देणं हा भाजपाचा अंहकार असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. भाजपाने सत्ता स्थापन करण्यास नकार देत महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण मिळाल्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याचं सांगितलं आहे.
“राज्यात सत्ता स्थापन करण्यास नकार देणं हा भाजपाचा अहंकार आहे. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. ते विरोधी बाकावर बसण्यास तयार आहेत. पण ५०-५० फॉर्म्यूला मान्य करण्यास तयार नाहीत. निवडणुकाआधी त्यांनीच हा फॉर्म्यूला मंजूर केला होता,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
यावेळी त्यांनी भाजपा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “राज्यपालांनी आम्हाला जास्त वेळ दिला असतं तर बरं झालं असतं. भाजपाला ७२ तास देण्यात आले, मात्र आम्हाला कमी वेळ देण्यात आला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी भाजपाना ही योजना आखली आहे”.
“राज्यपालांनी भाजपाला ७२ तासांची मुदत दिली होती. तर शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली आहे. आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागतो. पण, राष्ट्रपती राजवटीकडं ढकलायचंच अशा पद्धतीनं काम केल जात आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
शिवसेनेच सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेसोबत असल्याच सूचक वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. “सर्वच नेत्यांचा एकमेकांशी प्रेमाचा संवाद सुरू आहे. प्रत्येक नेत्याला राज्याविषयीच्या कर्तव्यांची जाण आहे. राज्यात अस्थिरता राहू नये. राष्ट्रपती राजवटी आणण्याचा प्रयत्न होतोय. त्याला आव्हान द्यावं यासाठी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं एकमत आहे. तत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगू नये, भाजपा पीडीपी युती लव्ह जिहाद होता का?,” असा सवाल राऊत यांनी केला आहे.
“ज्यांनी खोटं बोलून अंहकाराच्या भूमिकेतून राज्याला या परिस्थितीत ढकललं ते महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. त्यामुळं भाजपाचा मुख्यमंत्री नको असं गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख पक्षांची भूमिका आहे. त्यामुळं काही मुद्यांवर मतभेद असतात. भाजपासोबतही आहेतच. पण, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष अफगाणिस्तानात तयार झालेले नाही. सर्व पक्षांचं राष्ट्राच्या उभारणीत योगदान आहे. तत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगू नये, तसं असेल तर भाजपा-पीडीपीची युती लव्ह जिहाद होता का?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
