scorecardresearch

हिंदुत्वावरुन संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले “बाळासाहेबांचं मन मोठं असल्याने…”

विले पार्लेच्या पोटनिवडणुकीत देशात पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली; संजय राऊतांनी करुन दिली आठवण

Shivsena, Sanjay Raut, BJP, Devendra Fadanvis, Hindutva, Balasaheb Thackeray
"….त्यांच्या इतिहासाची काही पानं फाडण्यात आली आहेत"

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेतला व ते युतीचे प्रमुख होते. मग त्यांच्यामुळे शिवसेना युतीमध्ये २५ वर्षे सडली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटते का, त्यांच्या निर्णयावर बोट ठेवत आहात का, असा परखड सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या निव्वळ गप्पा आहेत, भाषणापुरते व कागदावरचे आहे आणि राम मंदिर आंदोलनाच्या वेळीही शिवसेना नेते केवळ तोंडाच्या वाफा दडवत होते. हिंदुत्व हे जगायचे असते, अशी टीकाही फडणवीसांनी केली. दरम्यान हिंदुत्वावरुन फडणवीसांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.

युतीमध्ये २५ वर्ष सडलो म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले, “बाळासाहेबांनी सडत ठेवलं…”

“विले पार्लेच्या पोटनिवडणुकीत देशात पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी प्रचार केला होता. काँग्रेस आणि भाजपा विरोधात असतानाही आम्ही ही पोटनिवडणूक जिंकलो होतो. यानंतर सर्वांना झटका बसला होता. हिंदुत्वाचा मुद्दा लोकांना भिडला असून देशात हिंदुत्व वाढेल आणि त्यावर निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास निर्माण झाला. त्यानंतर भाजपाचे मोठे नेते बाळासाहेबांकडे आले आणि एकत्र निवडणूक लढू असं सांगितलं. मन मोठं असल्याने आणि हिदुत्वाच्या मतांचं विभाजन होऊ नये यासाठी बाळासाहेबांनी मान्य केलं. पण त्यावेळी अडवाणी, प्रमोद महाजन, अडवाणी असे मोठे नेते होते,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

नामर्दासारखे कार्टून दाखवू नका म्हणणाऱ्या पूनम महाजनांना संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…

“प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची भूमिका त्यावेळी फार महत्वाची होती. भाजपाचे जे आजचे नवहिंदुत्ववादी नेते आहेत त्यांच्या इतिहासाची काही पानं फाडण्यात आली आहेत त्यामुळे त्यांना माहिती नाही. पण त्यांना हवं असेल तेव्हा वेळोवेळी माहिती देत राहू,” असंही संजय राऊत म्हणाले.

“दिल्ली एक दोन व्यक्तींच्या हातात”

“दिल्ली काबीज करण्यासंबंधी बाळासाहेब थोरात यांनी केलेलं वक्तव्य योग्य आहे. दिल्ली काबीज करणं म्हणजे सर्वांना एका नेतृत्वाखाली एकत्र घेऊन भाजपाचं सरकार हटवणं. आज दिल्ली एक दोन व्यक्तींच्या हातात आहे. दिल्ली देशाची असून देशाचं वर्चस्व हवं. एखाद्या राजकीय पक्षाची किंवा व्यक्तीची नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

पूनम महाजन यांच्या टीकेला उत्तर –

संजय राऊत यांनी भाजपाला उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. यावरुन भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं होतं. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “ते कार्टून काय मी काढलं आहे का?…ते ट्वीट हटवलं नाही, जिथे पोहोचवायचं तिथपर्यंत ते पोहोचवलं आहे. प्रमोद महाजन हे त्या चित्रात बाळासाहेबांसमोर उभे आहेत. भाजपाच्या युतीचा तो सुरुवातीचा काळ होता. काल महाऱाष्ट्रातील भाजपा नेत्यांनी शिवसेनेसंबंधी जी वक्तव्यं केली, त्यात सत्य काय होतं हे दाखवण्यासाठी हे कार्टून शेअर केलं. आर के लक्ष्मण एक तटस्थ व्यंगचित्रकार होते. टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध केलेलं ते व्यंगचित्र होतं. त्यात इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नव्हतं. मी काही प्रमोद महाजन यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली नाही. तसं असतं तर त्यांनी त्यावेळीच ३५-४० वर्षांपूर्वी आक्षेप घ्यायला हवा होता. हे कार्टून उपलब्ध आहे”.

पुढे ते म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, मनोहर पर्रीकर या तिन्ही कुटुंबांचं भाजपाच्या वाढीत फार मोठं योगदान आहे. पण त्यांची पुढील पिढी आता कुठे आहे? त्यांचं भाजपाशी काय नातं आहे हे पहावं लागेल”. पूनम महाजन सध्या कुठे आहेत माहिती नाही. त्यामुळे त्यांनाही मला सध्या त्या कुठे आहेत असं विचारायचं आहे असं राऊत म्हणाले. पण माझे आणि महाजन कुटुंबाचे चांगले संबंध आहेत असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut on bjp devendra fadanvis hindutva balasaheb thackeray sgy

ताज्या बातम्या