सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यानंतर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या आणि मला अटक करा अशा शब्दांत आव्हान दिलं आहे. मला रोखण्यासाठी हे कारस्थान रचलं जात असून, माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही असंही ते म्हणाले आहेत. संजय राऊतांनी यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केलं आहे. ईडीने संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणी समन्स बजावलं असून उद्या हजर राहण्यास सांगितलं आहे. संजय राऊतांचं ट्विट - "मला आताच ईडीने समन्स पाठवलं असल्याचं समजलं. छान…महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा," असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे. Eknath Shinde Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; एकनाथ शिंदेंसह बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेतली; जाणून घ्या प्रत्येक अपडेट या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याचसंदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहे. उद्या म्हणजेच २८ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये राऊत यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या संपत्तीवर जप्ती आणणारं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा? ईडीने आधीच जप्त केलेत ९ प्लॅट याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे. मनी लाँडरिंग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. ही संपत्ती ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’चे माजी निर्देशक प्रवीण राऊत यांच्या मालकीची पालघर, सफाळे, पडघा येथील जमीनींबरोबरच दादरमधील वर्षा राऊत यांचा फ्लॅट आणि अलिबामधील किहिम समुद्रकिनाऱ्यावरील वर्षा राऊत ज्या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत तसेच स्वप्ना पाटकर ज्या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत, या दोघींची एकत्रित मालकी असणाऱ्या जमिनीचा समावेश आहे. दिल्ली प्रकरणामध्येही चौकशीची शक्यता… उत्तर भारतामधील एका २००० हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात प्रवीण राऊत यांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्येही दिल्ली ईडीची टीम राऊत यांची चौकशी करु शकते असं एबीपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. यासंदर्भातील माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली असली तरी सध्या पाठवण्यात आलेली नोटीस ही पत्राचाळ प्रकरणातील आहे.