मुंबई : प्रभादेवी परिसरात शुक्रवारी सकाळी शिवसेनेच्या दोन गटात वादावादी झाली. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार महेश सावंत आणि शिवसेनेचे (शिंदे) माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चौकाच्या सुशोभिकरणाच्या कामावरून चांगलाच वाद पेटला. प्रभादेवी चौकाजवळ दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून या निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापू लागले आहे. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असून शिवसेनेच्या दोन गटांतील ही वर्चस्वाचीच लढाई ठरणार आहे. याची चुणूक शुक्रवारी प्रभादेवीत पाहायला मिळाली. प्रभादेवी चौकातील सुशोभिकरणावरून आमदार महेश सावंत आणि माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. या ठिकाणी सुरू झालेले सुशोभिकरणाचे काम सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडल्यामुळे वादाची ठिणगी पडली. त्यातून दोन्ही गटांतील कार्यकर्ते भिडले. हा वाद अखेर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला.

प्रभादेवी परिसरातील माजी आमदार सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यापासून ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांबरोबरच अनेकदा वाद झाला आहे. महेश सावंत हे एकेकाळी सरवणकर यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. मात्र सरवणकर यांनी ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर सावंत ठाकरे यांच्यासोबतच राहिले. सावंत यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून (ठाकरे) निवडणूक लढवली होती. सरवणकर विरुद्ध सावंत अशी ही मोठी लढत झाली होती. यात सावंत निवडून आले, तर सरवणकर यांना हार पत्करावी लागली होती. सावंत आणि सरवणकर यांच्यातील लढत संपलेली असली तरी रस्त्यावरची लढाई अद्याप सुरूच आहे. त्याचाच एक अंक शुक्रवारी पाहायला मिळाला. काही वर्षांपर्वी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही या दोन्ही गटांत वाद झाला होता.

हरलेल्या आमदाराला निधी कसा मिळतो ?

या प्रकरणानंतर आमदार महेश सावंत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार सदा सरवणकर हे निवडणूक हरले आहेत. तरीही त्यांना सुशोभिकरणाच्या कामासाठी निधी कसा काय मिळतो आणि जिंकून आलेल्या आमदाराला महापालिका निधी का देत नाही. इथे लोकशाही उरलेलीच नाही, अशीही उद्वीग्न प्रतिक्रिया सावंत यांनी व्यक्त केली. या प्रकरणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही ते म्हणाले.

पालिकेचे अधिकारी शिंदे यांच्या दबावाखाली काम करतात. पालिकेचे अधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे. शिंदे यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींना प्राधान्य दिले जाते. पालिकेचे अधिकारी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांपुढे हतबल झाले आहेत. यांना विरोध केला तर आम्हाला कुठल्या तरी प्रकरणात अडकवतील, कुठे चौकशी लावतील, अशी भीती त्यांना वाटते, असाही आरोप सावंत यांनी केला आहे.