मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या शिवशाही बसने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी जोरदार टक्कर दिली होती. वाहतुकीच्या स्पर्धेत शिवशाही अग्रगण्य ठरत होती. परंतु, आता एसटीचा मोठा ब्रॅण्ड असलेली शिवशाही हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिवशाहीचे रुपांतर हिरकणी बसमध्ये करण्यात येत आहे. शिवशाहीचे रुपांतर झालेली पहिली हिरकणी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली असून लवकर प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. परंतु, आठ वर्षांतच शिवशाहीची सेवा समाप्त झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे शिवशाहीचे हिरकणीत रुपांतर

एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाही बस हिरकणी बसमध्ये परावर्तित करण्याचे नियोजन केले. त्यानुसार, पुण्यातील दापोडी येथील एसटीच्या छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत शिवशाही बसचे हिरकणी बसमध्ये रूपांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दापोडी येथे टाटा शिवशाही बसचे हिरकणी बसमध्ये रूपांतर झाले असून, ही बस लवकरच प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. एसटी महामंडळ सर्व शिवशाही बस, टप्प्याटप्प्याने हिरकणी बसमध्ये परावर्तित करणार असून भविष्यात शिवशाही बस राज्यातील रस्त्यावर धावताना दिसणार नाही.

इंजिनवरील भार कमी होणार

एसटी महामंडळाच्या ताफ्यात ७९२ वातानुकूलित शिवशाही बस आहेत. या सर्व बसचे रुपांतर हिरकणीमध्ये करण्यात येणार आहे. शिवशाही बसमधील वातानुकूलित यंत्रणेमुळे इंजिनवर जास्त भार येत होता. त्यामुळे शिवशाहीची वातानुकूलित यंत्रणा बंद करून हिरकणीत परावर्तीत करण्यात येणार आहे. त्यामुळे इंजिनवरील भार कमी होईल. शिवशाहीच्या रंगसंगतीत बदल करण्यात येणार आहे. तसेच, आसनात बदल केला जाणार आहे. हिरकणीमध्ये ४४ आसने असतील.

आठ वर्षात शिवशाहीचा अंत

एसटी महामंडळाने प्रवाशांना लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी वातानुकूलित, आरामदायी आणि किफायतशीर दरात सेवा मिळावी म्हणून शिवशाही आपल्या ताफ्यात दाखल केली. तत्कालीन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली. मुंबई रत्नागिरी मार्गावर १० जून २०१७ रोजी शिवशाही बस सुरू झाली. राज्यातील ७५ मार्गांवर शिवशाही धावू लागली. शिवशाही बसमध्ये शयनयान आणि आसन असे दोन्ही पर्याय उपलब्ध होते. एसटी महामंडळ आणि खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून शिवशाही चालविण्यात येत होती. यासाठी सात कंत्राटदार नेमण्यात आले होते. सातही कंत्राटदार आसन व्यवस्था असलेल्या बस आणि तीन कंत्राटदार शयनयान सेवा असलेली शिवशाही चालवित होते. मात्र, दोन वर्षांतच वातानुकूलित शयनयान सुविधा असलेली शिवशाही बंद झाली. सध्या फक्त वातानुकूलित आसन व्यवस्था असलेली शिवशाही धावत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी महामंडळाचे म्हणणे काय…

सर्व शिवशाही बसचे रुपांतर हिरकणीमध्ये होणार आहे. सध्या एका शिवशाही बसचे रुपांतर हिरकणी बसमध्ये झाले असून, उर्वरित शिवशाहीचे रुपांतर टप्प्याटप्प्याने होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.