प्रति टप्प्याचे दर अध्र्यावर आणण्याचा प्रस्ताव; खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा
आर्थिक प्रगतीच्या नावाने ओरड असणाऱ्या एसटी महामंडळाला ‘गती’ देण्यासाठी ‘शिवशाही’ बस गाडीच्या प्रति टप्प्याचे भाडे इतर बस गाडय़ांच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. वातानुकूलित शिवशाही बस गाडीचे प्रति टप्प्याचे दर ८.७० रुपये तर वातानुकूलित शयनयानी शिवशाही बस गाडीचे दर ९ रुपये निश्चित करण्याचा विचार सुरू झाला आहे. सध्या शिवनेरीचा दर प्रति टप्पा १५.८० रुपये आहे.
या प्रस्तावित दरांना परवानगी मिळाल्यास हे दर वातानुकूलित शिवनेरी बस गाडीच्या तुलनेत प्रति टप्पा ७.१ रुपयांनी कमी असणार असल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
राज्यभरातील खासगी वाहतूकदारांकडून एसटी बस गाडय़ांच्या तुलनेत आरामदायी बस गाडय़ांच्या भाडय़ात सवलत दिली जाते. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत दिवसागणिक घट होत आहे. याच धर्तीवर काही दिवसांपूर्वी अत्याधुनिक सोयीसुविधा आणि मनोरंजन पॅकेज असणाऱ्या शिवशाही बस गाडीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात तब्बल ५०० शिवशाही बस गाडय़ा टप्प्याटप्प्याने एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
शिवशाही वातानुकूलित या बस गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवशाही बस गाडीचा प्रति कि.मी. खर्च अंदाजे ३४.७३ रुपये इतका असून प्रस्तावित दरांनुसार या बसला ७० टक्के भारमान मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रति कि.मी. उत्पन्न ४५.१५ रुपये मिळणे अपेक्षित असून कि.मी.ला महामंडळाला १०.४२ रुपयांचा नफा अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांसाठी शिवशाही बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात खासगी बस गाडय़ांचे प्रवासी एसटीच्या शिवशाही बस सेवाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.
बसचा प्रकार आणि प्रति टप्पा दर
* शिवशाही (वातानुकूलित) ८.७० रु (प्रस्तावित)
* शिवशाही (शयनयानी वातानुकूलित) ९.०० रु (प्रस्तावित)
* शिवनेरी (वातानुकूलित) १५.८०रु
* शिवशाही (शयनयानी वातानुकूलित) १५.७५ रु