समीर कर्णुक, लोकसत्ता

मुंबई : विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात सध्या मोठय़ा प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. औषधांचा केवळ ३० टक्के साठा रुग्णालयात उपलब्ध असल्याने गरीब रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. तर सुविधांचा अभाव असल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना उपचारासाठी शीव अथवा राजावाडी रुग्णालयात पाठवावे लागत आहे. 

पूर्व उपनगरांमध्ये घाटकोपरमधील राजावाडी आणि गोवंडीतील शताब्दी अशी दोन मोठी रुग्णालये उपलब्ध आहेत. या रुग्णालयांत चेंबूर, गोवंडी, शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, वाशी नाका, माहुल गाव, ट्रॉम्बे, मानखुर्द, कुर्ला, नेहरू नगर भागातील हजारो गरीब-मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात विविध आजारांवरील औषधे आणि इतर आवश्यक साहित्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयात केवळ ३० टक्केच औषधे शिल्लक असून रुग्णांसाठी लागणारी अन्य औषधे त्यांच्या नातेवाईकांना बाहेरील औषधांच्या दुकानातून विकत घ्यावी लागत आहेत. तापासाठी देण्यात येणारी पॅरासिटमॉलसारखी गोळी आणि धनुर्वाताचे इंजेक्शनही अनेक दिवसांपासून या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. यामुळे रुग्ण आणि येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शीव-पनवेल महामार्ग, पूर्व मुक्त महामार्ग आणि घाटकोपर-मानखुर्द जोड रस्ता अशा तिन्ही मुख्य मार्गावर शताब्दी रुग्णालय आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना शताब्दी रुग्णालयातच उपचारासाठी आणण्यात येते. मात्र या रुग्णालयात जखमेवर बांधण्यासाठी बँडेज, कापूस आणि इतर औषधेच उपलब्ध नसतात. परिणामी, अपघातात जखमी झालेल्यांना शीव अथवा राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात येते. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावत असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली. दोन दिवसात पुरेशी औषधे उपलब्ध न झाल्यास रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंच्या तुटवडय़ाबाबत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. मात्र, अद्यापही पुरवठा झाला नसून येत्या दोन-चार दिवसात साठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  – सुनील पाकळे, मुख्य वैद्यकीय अधिकारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक महिन्यांपूर्वी माझ्या मुलाच्या पायाला मार लागला आहे. तेव्हापासून मी शताब्दी रुग्णालयात येत आहे. मात्र रुग्णालयात पायावरील जखमेला बांधण्यासाठी बँडेज नसल्याने ते बाहेरील औषधाच्या दुकानातून आणण्यास सांगितले आहे. मात्र या बँडेजची किंमत एक हजार रुपये आहे. मी घरकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्यामुळे उपचारासाठी इतके पैसे कुठून आणणार? – सोनाबाई कांबळे, रहिवाशी