पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतापाची लाट; भाजपकडूनही प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानभेटीवर टीका करताना पिंपरी चिंचवड येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी त्यांचा थेट एकेरीत उल्लेख केला. तसेच पाकिस्तानात त्यांच्यावर हल्ला झाला असता तर एका दिवसात मोदी संपले असते व त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्यावर आली असती, अशी मुक्ताफळे सबनीस यांनी उधळली होती. त्यांच्या या मुक्ताफळांवर साहित्यवर्तुळात तसेच सामान्यांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पाश्र्वभूमीवर आज शनिवारी लातुरात सबनीस यांची प्रकट मुलाखत होत आहे. या मुलाखतीत ते काय बोलतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
आकुर्डी येथील महाविद्यालयातील विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी बोलताना गुरुवारी सबनीस यांनी मोदींवर टीका केली होती. तसेच त्यांचा एकेरी उल्लेखही केला होता. या त्यांच्या मुक्ताफळांवर साहित्यवर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे. लातूर येथील सत्कार समितीचे समन्वयक प्रा. फ. म. शहाजिंदे यांनी सबनीस यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करताना त्यांनी आपले पद लक्षात घेऊन संयत शब्दांचा वापर करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच डॉ. शेषराव मोहिते यांनीही सबनीस यांच्यावर टीका करताना पंतप्रधानपदाची एक प्रतिष्ठा आहे. ती जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असलेल्यांची ही जबाबदारी तर अधिक आहे. त्यांनीच असा एकेरी उल्लेख करणे हे खटकणारे आहे, असे डॉ. मोहिते म्हणाले. कथाकार डॉ. भास्कर बडे यांनी सबनीसांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

..तर त्यांची कामगिरी कळेल
मुंबई : श्रीपाल सबनीस यांनी राजकारणावर बोलण्यापेक्षा साहित्यावर बोलले तर त्यांची साहित्यातील कामगिरी रसिकांना कळेल, असा टोला भाजपतर्फे प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, ‘साहित्य संमेलन आणि अध्यक्ष यांबद्दल आम्हाला आदर आहे. पण संमलेनाध्यक्षांनी साहित्यावरच बोलणे अपेक्षित आहे. पण ते साहित्याबद्दल फार काही बोलल्याचे ऐकिवात नाही, मात्र ते मोदींबद्दल बोलत आहेत’.