scorecardresearch

‘सिद्धिविनायक’च लक्ष्य होते!

सिद्धिविनायक मंदिरावर हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तोयबा आणि ‘आयएसआय’ यांनी रचला होता.

सिद्धिविनायक मंदिरावर हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तोयबा आणि ‘आयएसआय’ यांनी रचला होता.
सिद्धिविनायक मंदिरावर हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तोयबा आणि ‘आयएसआय’ यांनी रचला होता.

२६/११च्या हल्ल्यात सीएसटीचा विचारही नव्हता : हेडलीचा गौप्यस्फोट
मुंबईवरील हल्ल्यासाठी सीएसटी स्थानक कधीच लक्ष्य नव्हते तर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरावर हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तोयबा आणि ‘आयएसआय’ यांनी रचला होता. त्या मंदिराची मी विशेष पाहणी व चित्रीकरण केले होते, असा गौप्यस्फोट हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक डेव्हिड कोलमन हेडली याने मंगळवारी विशेष न्यायालयासमोर केला. एवढेच नव्हे, तर २६/११च्या हल्ल्याच्या एक वर्ष आधी हॉटेल ताजमहलमध्ये होणाऱ्या भारतीय सुरक्षा वैज्ञानिकांच्या बैठकीवरही हल्ल्याचा कट होता. त्याचा सरावही झाला होता. मात्र बैठकच रद्द झाल्याने तो बारगळला, असा खुलासाही त्याने केला.
२६/११ हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक अबू जुंदाल याच्यावर मुंबईच्या विशेष न्यायालयात खटला सुरू असून हेडली या प्रकरणात माफीचा साक्षीदार आहे. अमेरिकेतून ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांच्यासमोर त्याची साक्ष नोंदवण्यात येत आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उत्तरे देताना हेडलीने हल्ल्यापूर्वी मुंबईत कितीवेळा आलो, कुठे राहिलो, कोणत्या ठिकाणांची पाहणी व चित्रीकरण केले याची माहिती दिली. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याच्या आदेशानुसार ही कामे मी केली.
नोव्हेंबर २००६ मध्ये मुझफ्फराबाद येथे झालेल्या बैठकीत मात्र हल्ल्याची ठिकाणे ठरली नव्हती. साजिद मीर आणि अबू काहफा यांना महत्त्वाच्या ठिकाणांची चित्रफित दिली. त्यानंतर पुन्हा बैठक होऊन मला सिद्धिविनायक मंदिराच्या विशेष पाहणीचे आदेश दिले गेले, असा खुलासा हेडलीने केला.
त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत येऊन समुद्रमार्गाचा तपशील आणि दहशतवादी ज्या किनाऱ्यावर उतरणार होते त्याचा तपशील जीपीएस यंत्रणेद्वारे नोंदवला. तसेच तोही पाठविला. आयएसआयचे कर्नल शहा आणि लष्करचे ब्रिगेडियर रियाज यांच्यासह अनेक पाकिस्तानी लष्करप्रमुखांची तसेच दहशतवादी म्होरक्यांची नावे घेत त्यांच्या गाठीभेटी झाल्याचेही त्याने उघड केले. भारतीय लष्करी अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया, लष्करी तुकडय़ांच्या हालचाली यांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली होती, असेही त्याने सांगितले.
भारतातील दहशतवादी कारवायांसाठी लष्कर-ए-तोयबाच जबाबदार आहे. या संघटनेचा म्होरक्या झकी-उर-रहमान याच्या आदेशानेच या कारवाया होतात, असेही त्याने सांगितले. ऑक्टोबर २००३ मध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद यालाही मी भेटलो होतो. लष्करने आयोजिलेल्या सभेत मसूदने भारतातील अटक आणि सुटकेविषयी भाषण दिले होते, असेही हेडलीने सांगितले.
हेडली हे नाव धारण करून पहिल्यांदा मुंबईत दाखल झालो. त्या वेळेस बशीर शेख या तहव्वूर राणाच्या मित्राने ‘आऊटरन’ हॉटेलात आपली राहण्याची सोय केली होती. ब्रीच कॅण्डी येथे राहणाऱ्या मीरा कृपलानी यांच्याकडेही मी पेईंग गेस्ट म्हणून वास्तव्यास होतो, असेही तो म्हणाला.

पत्नीनेच बिंग फोडले
डिसेंबर २००७ मध्ये दुसरी पत्नी फैजा ओटाला हिने आपल्याविरोधात लाहोर येथील पोलीस ठाण्यात छळवणुकीची तक्रार केली होती. आपले लष्करशी संबंध आहेत आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोपही तिने त्या वेळी केला होता.

हेडलीने चित्रीकरण केलेली ठिकाणे
ताजमहल हॉटेल, महाराष्ट्र पोलीस मुख्यालयासह कुलाबा येथील शहीद भगतसिंग मार्गाहून कुलाबा पोलीस ठाण्यापर्यंतचा सर्व मार्ग, कॅफे लिओपोल्ड, नरिमन हाऊस, सीएसटी रेल्वे स्थानक, हॉटेल ओबेरॉय.

आयएसआयचेच पाठबळ
पाकिस्तानची ‘आयएसआय’ ही गुप्तचर संघटना पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना भारतविरोधी कारवायांसाठी पूर्ण साह्य़ करते, असे सांगत हेडलीने पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर विभागातील कर्नल शाह, लेफ्ट. कर्नल हामझा आणि मेजर सलीम अली तसेच निवृत्त लष्करी अधिकारी अब्दुल रेहमान यांची नावे घेतली.

अमेरिकेची ग्वाही
हेडली याच्या गौप्यस्फोटानंतर या हल्ल्याच्या सूत्रधारांवर कारवाई करण्यासाठी भारताला सर्वतोपरी मदतीची ग्वाही अमेरिकेने दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किबी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-02-2016 at 06:37 IST

संबंधित बातम्या