राज्यात सक्रिय रुग्णसंख्येत ऑगस्टमध्ये लक्षणीय घट!

निर्बंध उठले, राजकीय यात्रा- राडे होऊनही रुग्णसंख्येत घट

corona update maharashtra
राज्यात २५ ऑगस्ट रोजी ५०,१८३ सक्रिय रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये सरकारकडून वेगवेगळे निर्बंध उठविण्यात येत आहेत तर दुसरीकडे राजकीय यात्रा व वादाचा भडका उडाला असतानाही ऑगस्ट महिन्यात राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे.

राज्यात २५ ऑगस्ट रोजी ५०,१८३ सक्रिय रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली असून १ ऑगस्टपासून यात मोठी घसरण झाली आहे. १ ऑगस्ट रोजी राज्यात ७८,९६२ सक्रिय रुग्ण होते. १० ऑगस्ट रोजी ही संख्या कमी होऊन ६६,१२३ एवढी झाली तर २० ऑगस्टला ५५,४५४ असलेली ही सक्रिय रुग्णसंख्या आणखी कमी होऊन २५ ऑगस्ट रोजी ५०,१८३ एवढी खाली आली. ऑगस्टमध्ये राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या घसरुन २८,७७९ एवढी कमी झाली आहे. आजघडीला देशात केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे १,५९,८८७ एवढी रुग्णसंख्या आहे तर देशात ३,२२,३२७ सक्रिय रुग्ण नोंद आहे.

राज्यातील पहिल्या पाच सक्रिय रुग्ण असलेल्या जिल्ह्यांत पुणे प्रथम क्रमांकावर असून तेथे १२,६७३ रुग्ण म्हणजे राज्यातील एकूण रुग्णांच्या २५.२५ टक्के रुग्ण आहेत. ठाणे ७,०४१ रुग्ण १४.०३ टक्के, सातारा ५,४०० सक्रिय रुग्ण १९.७६ टक्के, अहमदनगर ४७१६ रुग्णसंख्या ९.४० टक्के तर सांगलीमध्ये ४६६८ सक्रिय रुग्ण ९.३० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. या पाच जिल्ह्यात ३४,४९८ सक्रिय रुग्ण असून राज्यातील एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ६८.७४ टक्के आहे. यातील महत्वाचा भाग म्हणजे अनेक जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे. यात नंदूरबार, वर्धा, यवतमाळ, भंडारा, वाशीम, धुळे, परभणी, अकोला, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, बुलढाणा, जळगाव, हिंगोली, जालना, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यात नंदूरबार मध्ये एकही सक्रिय रुग्ण आजच्या दिवशी नाही तर गोंदिया व वर्धा येथे चार रुग्ण तसेच यवतमाळ आणि भंडारा येथे सहा रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी २५,०२५ रुग्ण राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असून यात ९२९३ रुग्ण गंभीर आहेत तर १४१४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आणि ३५६८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. याशिवाय २१५४ रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. एकीकडे तिसऱ्या लाटेची मोठी चिंता केंद्र सरकार तसेच निती आयोगाकडून व्यक्त होत असताना ऑगस्टमध्ये अनेक निर्बंध उठवूनही सक्रिय रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. राज्य कृती दलाचे डॉक्टर तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर सक्रिय रुग्णसंख्या कमी झाल्याच्या कारणांचा मागोवा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Significant decline in active patient numbers in the state in august srk