मुंबई : या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थांमधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातून प्रवेश निश्चित झाले आहेत. परंतु विद्यार्थ्यांपैकी काही उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेत शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. दरम्यान सहा महिन्यांच्या मुदतीत संबंधित विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित विद्यार्थी जबाबदार राहतील.
गतवर्षीच्या विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदत
यंदाच्या शैक्षणिक वर्षात जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येत असलेल्या अडचणीमुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याबरोबरच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकलेले नाहीत, अशा उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ न शकल्यास त्यास संबंधित विद्यार्थी जबाबदार राहतील.