मुंबई : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या कार्यालयात होणाऱ्या गर्दींचा मुख्यमंत्री सचिवालयाच्या कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊन प्रसारमाध्यमे आणि अभ्यागतांना सहाव्या मजल्यावर प्रवेश निर्बंध लागू करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. त्याचच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क आणि मुलाखत विभागाचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंत्रालयात मुख्य इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्याचे दालन तसेच मुख्यमंत्री सचिवालय आहे. त्याला जोडूनच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दालने आणि कार्यालये आहेत. मुख्य सचिवांचे कार्यालयही याच मजल्यावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात खासदार, आमदार, पक्षांचे नेते त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडे कामासाठी येणाऱ्या नागरिकांचाही मोठा राबता असे. खासदार, आमदारांचे स्वीय सहाय्यक, पक्षाचे नेते थेट मुख्यमंत्री सचिवालयात येऊन कागदपत्रे घेत असत. या गर्दीमुळे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांना काम करणे मुश्कील झाले होते. सुरक्षेचा विचार करून सहाव्या मजल्यावरील गर्दीवर नियंत्रण आणण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे.

हेही वाचा >>> Singer Shaan : प्रसिद्ध पार्श्वगायक शान राहत असलेल्या निवासी इमारतीला आग, ८० वर्षांची महिला गंभीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दालनांच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर

महायुती सरकारच्या ४२ मंत्र्यांपैकी २२ मंत्र्यासाठी लागणारी नवीन दालने निर्माण करण्याचे काम मंत्रालयात युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणाऱ्या फेररचनेसाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या व सातव्या मजल्यांना सध्या फर्निचर कारखान्याचे स्वरूप आले आहे. महायुतीतील मित्रपक्षांच्या रुसवेफुगव्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपानंतर आता दालन व बंगले वाटप झाले. सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातील सुशोभीकरणाला वेग आला आहे. नवीन मंत्र्यासाठी अधिकाऱ्यांची दालने रिकामी करून त्या जागी मंत्र्यांची दालने तयार केली जात आहेत. काही राज्यमंत्र्यांना तर मुख्य इमारतीतील पोटमाळे देण्यात आले आहेत.