मुंबई : दादर (पश्चिम) येथील मुंबई महापालिकेच्या भागोजी बाळूजी कीर स्मशानभूमीमध्ये इतस्तत: मानवी हाडे आणि कवट्या पडलेल्या दिसत असल्याची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच स्मशानभूमीच्या व्यवस्थापनाबद्दलही शंका उपस्थित होऊ लागली आहे. या प्रकरणावरून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क परिसरात मुंबई महापालिकेची भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीला लागूनच दफनभूमी, दहनवाहिनी, केश कर्तनालय, प्रार्थनागृह आहे. सध्या स्मशानभूमीमध्ये पारंपरिक पद्धतीने, तसेच विद्युत दहनवाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात येतात. ही स्मशानभूमी सध्या चर्चेत आली आहे. या स्मशानभूमीत मानवी हाडे, अवशेष अस्ताव्यस्त पडल्याची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर वायरल झाली आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दादरसारख्या मध्यवर्ती भागातील या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर मृतदेह येत असतात. मात्र या स्मशानभूमीबाबतच्या या ध्वनिचित्रीफितीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या ध्वनिचित्रफितीमुळे स्मशानभूमीच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, समाजमाध्यमांवर याबाबतची माहिती मिळताच पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ भागोजी बाळूजी कीर स्मशानभूमी परिसराला भेट देऊन स्थळ निरीक्षण केले. या पाहणीदरम्यान स्मशानभूमी परिसरात कुठेही हाडांचा खच आढळला नाही. मात्र ही ध्वनिचित्रफित स्मशानभूमीतील नसून बाजूलाच असलेल्या दफनभूमीतील असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच ध्वनिचित्रफीतीतही हाडांचा खच नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

ध्वनिचित्रफित दफनभूमीतील…

या स्मशानभूमीला लागूनच एक दफनभूमी आहे. लहान मुलांचे दफनविधी या ठिकाणी होतात. तसेच हिंदू धर्मातील काही विशिष्ट समाजात मृतदेह येथे पुरले जातात. त्यांच्यासाठी ही दफनभूमी वापरली जाते. ही ध्वनिचित्रफित १८ जुलै रोजीची असल्याचे समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दफनभूमी रिकामी करतानाचे चित्रिकरण…

दादर येथील स्मशानभूमीलगत असलेल्या दफनभूमीमध्ये मृतदेहाचे दफन केल्यानंतर साधारणपणे १८ महिन्यांनी सदर जागा पुन्हा वापर होण्यासाठी रिकामी करण्यात येते. १८ जुलै रोजी जागा रिकामी करण्याची कार्यवाही सुरू असताना सदर चित्रीकरण करण्यात आल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या दिवशी दुपारी १.३० वाजता स्मशानभूमीमध्ये मृतदेहाचे दफन करण्याकरीता पार्थिव आणले. त्याचवेळी १८ महिने पूर्ण झालेल्या दफन खड्ड्याचे खोदकाम करण्यात आले. साधारणपणे १८ महिन्यांपूर्वी दफन केलेल्या मृत देहाच्या अस्थी दादर दफनभूमीमध्ये नियोजित ठिकाणी जतन करून ठेवण्यात येतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कार्यवाही सुरू असताना दुसऱ्या मृतदेहाचे दफन करण्याकरिता पार्थिव आणले गेले. त्यामुळे त्वरित दुसरा दफन खड्डा खणण्यात आला. याचदरम्यान दुसरा खड्डा खणत असताना उपरोक्त चित्रीकरण झाल्याची शक्यता आहे, असेही अधिकारी म्हणाले.