अल्प किमतीत मिळालेल्या सरकारी भूखंडाचा व्यापारी वापर करण्याआधी शुल्क अदा करणे आवश्यक असतानाही तशी तसदी न घेता स्मिता ठाकरे यांच्या ‘मुक्ती फौंडेशन’ने बिनधास्तपणे रेस्तराँ आणि लाऊन्ज बारसाठी मोकळे मैदान उपलब्ध करून देताना चित्रीकरणासाठी ही इमारत आंदण दिल्याचे दिसून येत आहे. व्यापारी वापर करताना भरावयाचे शुल्कही अद्याप उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आलेले नसतानाही हा वापर सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
स्मिता ठाकरे यांच्या भूखंडाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने सौहार्दाचीच भूमिका घेतल्याचे दिसून येते आह़े याच शेजारी असलेला भूखंड प्रसुतीगृहासाठी राखीव असून तो १९९९ मध्येच शांताबाई केरकर स्मृती ट्रस्टला वितरीत झालेला असतानाही हा भूखंड त्यांना मिळू नये, यासाठी आटापिटा करणारे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय ‘मुक्ती फौंडेशन’च्या भूखंडाबाबत मात्र मौन धारण करून आहेत.
‘मुक्ती फौंडेशन’ला सांस्कृतिक केंद्रासाठी १८,५०७ चौरस फूट भूखंड वितरीत करण्यात आला. या भूखंडावर फौंडेशनला एक इतके चटईक्षेत्रफळ आणि एक टीडीआर उपलब्ध झाला आहे. यानुसार एक चटईक्षेत्रफळाचा वापर करून सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र त्याचवेळी टीडीआरचा वापर करून आठमजली बिझनेस पार्क उभारण्यात आले असून ते मात्र पूर्ण झाले आहे. या बिझनेस पार्कमध्ये लेवो रेस्तराँ आणि लाऊन्ज बारला सुमारे पाच हजार चौरस फूट इतकी जागा देण्यात आली आहे. एकूण क्षेत्रफळाच्या १५ टक्के म्हणजे साधारणत: साडेपाच हजार चौरस फूट इतके चटईक्षेत्रफळ व्यापारी वापराकरीता देण्याची फौंडेशनला मुभा आहे. प्रत्यक्षात असलेल्या परवानगीपेक्षा अधिक जागेचा व्यापारी वापर सुरू असल्याचे दिसून येते. अधूनमधून चित्रीकरणही सुरू असते. तसेच रेस्तराँमुळे मॉडेल टाऊन परिसरातील रात्रीची शांतता भंग पावली आहे, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे.
असा होतोय व्यापारी वापर..
मुक्ती बिझनेस पार्कमध्ये आठव्या मजल्यावर मुक्ती फौंडेशनचे कार्यालय आह़े तर खालचे काही मजले बंद असून एका मजल्यावर मुक्तीच्या महिला मार्शलना प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीला तसेच मुक्ती चित्रपट प्रशिक्षण केंद्र अशी कार्यालये आहेत. मोझरबीअर कंपनीलाही एक मजला देण्यात आला होता. परंतु ती कंपनी सध्या बंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कंपन्यांकडून भाडे आकारले जात नाही, असा फौंडेशनचा दावा आहे. परंतु हा व्यापारी वापरच असून तो बेकायदा असल्याचा आरोप केला जात आहे.