परवाच गणेशविसर्जन झाले. गणेशाची मूर्ती शाडूची असावी म्हणून पर्यावरणप्रेमी आग्रह धरतात आणि ते काही अंशी योग्यही आहे. पण काही वर्षांपूर्वी आयआयटीतील पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डॉ. श्याम असोलेकर यांनी केलेल्या एका प्रयोगाचे निष्कर्ष अगदीच वेगळे होते. त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू आणि कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्ती पाणी भरलेल्या काचेच्या तीन वेगवेगळ्या भांडय़ात ठेवल्या. पीओपीची मूर्ती महिन्याभरानंतरही विरघळली नव्हती हे तर खरेच, मात्र इतर दोन्ही मूर्तीबाबतही फारसा उत्साहजनक निकाल नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तीमुळेही पाणी प्रदूषित झाले होते. त्यातल्या त्यात शाडूची मूर्ती इतर दोघांच्या तुलनेत उजवी असली तरी या मूर्तीमुळेही तलावाचे पाणी दूषित होणार हे प्रयोगाअंती निष्पन्न झाले. असे का झाले? कारण मुंबईची जमीन किंवा तलावातील गाळाची माती ही शाडूची नाही. त्यामुळे शाडूची मूर्ती तलावात विसर्जति केली तरी त्या चिकणमातीचे कण माशांच्या कल्ल्यांमध्ये अडकून त्यामुळे त्रास होण्याची शक्यता राहतेच. मूर्तीसाठी माती चिकट असण्याचीही गरज असते. अशा वेळी ती विसर्जति करून पाण्यात विरघळलेल्या मूर्तीच्या मातीतून पुढच्या वर्षी गणेशमूर्ती करावी हे खरे तर आपल्या परंपरेला आणि पर्यावरणाला साजेसे. पर्यावरणाचा किती सखोल विचार करण्याची गरज आहे, हे या प्रयोगाअंती दिसून आले.

आपण आपल्या मातीचे कसे आणि किती प्रदूषण करतो याचा हा केवळ एक दाखला. मुळात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरात शेती हा काही प्रमुख उद्योग नाही आणि मात्र तरीही मातीचे प्रदूषण हा मुद्दा गौण ठरत नाही. हवा, पाणी, आवाज यांच्या प्रदूषणाबाबत आपण अनेकदा ऐकतो, चर्चा करतो, पण मातीच्या प्रदूषणाबाबत मात्र फारसे बोलले जात नाही. कारण हल्ली मुंबईत माती दिसतच नाही. मदाने आणि बागांमध्ये ट्रक भरून माती आणून टाकली जाते तेवढीच. इतर ठिकाणी तर सिमेंटचे रस्ते, लाद्या, दगड, पेव्हर ब्लॉकने आपण मातीचा श्वास कोंडून टाकला आहे. नाही म्हणायला, धूळीमुळे होणारे हवेचे प्रदूषण एवढाच आपला मातीशी संबंध असतो. त्यातही लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे ही धूळ खरेतर मातीची नसतेच, ती असते बांधकामात वापरले जाणारे सिमेंट, वाळू नाहीतर वाहनातून बाहेर पडणाऱ्या कणांची.

आपण मातीला कितीही कोंडून ठेवले असले तरी मातीच्या प्रदूषणाचे परिणाम आपल्याला या ना त्या कारणाने भोगावे लागतात. मातीचे प्रदूषण होण्यासाठी अनेक कारणे आहेत. खाण, अपघाताने रसायने जमिनीवर सांडणे, आम्लाचा पाऊस (डोंबिवलीत पडलेला हिरवा पाऊस आठवतोय?), सतत केली जाणारी शेती, त्यासाठी वापरली जाणारी रासायनिक खते, कारखान्यातून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी, रस्त्याचे-बांधकामाचे टाकले जाणारे डेब्रिज, कचराभूमी, सांडपाण्याचे फुटलेले पाइप किंवा शौचालयाच्या टाक्यांमधून जमिनीत होणारी गळती.. आणि इतरही अनेक प्रकारे मातीचे प्रदूषण होते. आपल्याकडे यातील सर्वच कारणे लागू पडत नाहीत. मात्र कचराभूमी आणि सांडपाणी ही दोन प्रमुख कारणे म्हणता येतील. रस्त्यावर सरसकट टाकले जाणारे प्लास्टिक हेदेखील एक कारण आहे. कचराभूमीची दुर्दशा तर विचारण्याची सोय नाही. ओला कचरा, रसायने, घातक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू असे कोणतेही वर्गीकरण न करता आणि त्यांची योग्य विल्हेवाट न लावता दररोज आठ हजार मेट्रिक टन (म्हणजे ८० लाख किलो) कचरा रोज मुंबईच्या कचराभूमीवर पडतो. याशिवाय शहरात जागोजागी, नाल्यांमध्ये तुंबून राहणारा कचरा तो वेगळाच. या कचराभूमीच्या जागेचे काय होते यासाठी महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाजवळ असलेल्या या उद्यानाच्या ठिकाणी पूर्वी कचराभूमी होती. मात्र एवढे मोठे संकुल बांधण्यापूर्वी हा परिसर चांगला दिसावा यासाठी येथे उद्यान करण्याचा अट्टहास करण्यात आला. मात्र या जमिनीखाली नेमके कुठे काय आहे हेच कोणाला माहिती नव्हते. कुठे प्लास्टिकचे थरच्या थर तर कुठे घातक पदार्थ. त्यामुळे येथे झाडे लावताना उद्यानतज्ज्ञांच्या नाकी नऊ आले. एवढे करूनही ही झाडे त्यांच्या सामान्य भावंडांप्रमाणे वाढू शकली नाहीत. जमिनीत मुळे खोलवर रुजण्यापेक्षा ही मुळे वरच्या थरात टाकलेल्या मातीतच समांतर वाढली आणि एकमेकांच्या मुळांचा आधार घेऊन उभी राहिली. त्यामुळे वाऱ्यापावसात एखादे झाड पडले की लगेचच त्याच्या आजूबाजूची चार-पाच झाडेही डगमगतात. कचराभूमीवर उद्यान उभे राहिले म्हणून राज्यकर्त्यांनी पाठ थोपटून घेतली असली, तरी कचराभूमी कशी असू नये याचेच हे उदाहरण ठरले. पण माहीमच्या या जागेच्या तुलनेत देवनार कित्येक पटींनी मोठे आहे. वीस-बावीस मीटर उंचीच्या कचऱ्याच्या ढिगांमधून पावसात जमिनीत किती प्रमाणात रसायने झिरपत असतील त्याची कल्पनाही भयावह आहे.

जमिनीतील या प्रदूषणाचे परिणाम येथील झाडांवरही दिसतात. त्यामुळेच रस्त्याच्या कडेला गटाराशेजारी असलेल्या झाडांना कीड लागण्याचे, ते पडण्याचे प्रमाण अधिक दिसते.

जमिनीचे नेमके कसे प्रदूषण झाले आहे त्यावरून त्याचे परिणाम ठरतात. लहान मुले मातीत खेळत असतील तर त्वचेला अ‍ॅलर्जी होणे, मळमळणे असे प्रकार होतात. पारा किंवा इतर धातू जमिनीत मिसळले असतील तर ते वाऱ्यावाटे फुप्फुसात जाऊन श्वसनाचे विकार होऊ शकतात, सांडपाण्यातील मोठय़ा प्रमाणात मिसळलेले नायट्रेट, अमोनिया हेदेखील त्रासदायक ठरतात. हवा, आवाज, पाणी यांच्या प्रदूषणासोबत पायाखालच्या जमिनीकडेही वेळीच लक्ष दिले पाहिजे, ते यासाठी.

prajakta.kasale@expressindia.com

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soil health issue
First published on: 17-09-2016 at 02:59 IST