तर्क वगैरे सगळ्या गोष्टी खुंटीला टांगून केवळ मनोरंजनाच्या किंबहूना नुसतंच हसवण्याच्या उद्देशाने बनवलेला ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट फार बरा होता असं नाही. त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला ‘सन ऑफ सरदार २’ पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा ओटीटीवर पाहून घ्यावा, याची काहीच गरज नाही. तरीही २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’पेक्षा आत्ताच्या चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही.

तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून अकरा वर्ष पत्नी डिंपलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरातल्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतो. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिंपल त्याला व्हिसा मिळाल्याची खूषखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेल्या जस्सीला वेगळाच धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे, म्हणून डिंपलने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलवून घेतलं आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिंपलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाहीत अशा अवस्थेत असलेल्या जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणी करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल, मेहविश आणि सबा या चार पाकिस्तानी तरुणींशी होते. त्यातल्या सबाचं एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगल्या खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगीच सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघी जस्सीला सबाचे वडील म्हणून या मुलाच्या घरच्यांना भेटण्याची गळ घालतात. दोन तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेल्या जस्सीसमोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माळच उभी राहते. या संकटातून हा सरदारपुत्र मार्ग काढतो का? आणि कसा काढतो? याचं उत्तर म्हणजे ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट.

पंजाबी सरदार मध्यवर्ती व्यक्तिरेखेत आहे, मुलाचे कुटुंबही पंजाबी असल्याने तिथेही रांगडे सरदारच आहेत. मुलाचे वडील राजा आणि त्याचे दोन भाऊ, त्यांची पोल डान्स करणारी परदेशी आई आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारे त्यांचे वडील असा एक मोठाच जुलूस असल्याने इथे काही तर्काच्या आधारे फार गोष्टी मांडण्याची गरजच उरत नाही. तरीही या चित्रपटात भारत – पाकिस्तान हा मुद्दा निव्वळ विनोदासाठी वापरला आहे. मूर्खपणाच्या प्रसंगांची एक मालिका एकत्र बांधणारा हा चित्रपट विजय कुमार अरोरा यांनी दिग्दर्शित केला आहे. अरोरा यांना २०१९ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पंजाबी चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. छायाचित्रणकार म्हणून हिंदीत अनेक मोठ्या चित्रपटांसाठी काम करण्याचा आणि पंजाबी चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने त्याचा काही एक बरा परिणाम एरव्ही वेडेपणासाठीच प्रसिध्द असलेल्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटावर झाला आहे. त्यामुळे अगदीच भरताड कमरेखालचे विनोद नाहीत, फार अश्लील चाळे वा संवादांची पेरणी नाही, तसंच या चित्रपटात कोणीही खलनायक नाही, त्या अर्थाने कुठलीही हाणामारी नाही हीसुध्दा बरं वाटायला लावणारी गोष्ट. बाकी चित्रपटाची गोष्ट फार काही दिव्य नाही, पण या चित्रपटातील काही व्यक्तिरेखा आणि कलाकार यांनी चित्रपटांमध्ये गंमत आणली आहे.

अभिनेता रवी किशन गेल्या काही चित्रपटांमध्ये फार भाव खाऊन जातो आहे. ‘लापता लेडीज’मधील त्याचा पोलिस अधिकारी आणि आता ‘सन ऑफ सरदार २’मध्ये साकारलेली राजा ही पंजाबी कुटुंबप्रमुखाची व्यक्तिरेखा त्याने दमदारपणे साकारली आहे. त्यामुळे रवी किशन हे रांगड्या सरदाराच्या भूमिकेत अजय देवगणवरही भारी पडले आहेत. जस्सीच्या भूमिकेत अजय देवगणला भोळसट दिसणं यापलिकडे फार काही करायचं नाही. चेहऱ्याला कमीतकमी त्रास देत तो हे काम चोख करू शकतो. राबियाच्या भूमिकेत मृणाल ठाकूर खूप सुंदर दिसली आहे तिच्यातला अवखळपणा, समंजस दृष्टी या सगळ्याचा दिग्दर्शकाने छान वापर करून घेतला आहे. मेहवीशच्या भूमिकेत कुब्रा सईत हेही एक वेगळं नाव. कुब्रामध्येही भरपूर उत्साह आहे आणि आधुनिक विचारसरणी, राहणीमान असलेली बिनधास्त मेहवीश तिने मस्त साकारली आहे. मात्र या सगळ्या गर्दीत दीपक दोब्रियाल नामक अभिनेत्याने अगदी कमाल केली आहे. दीपक मुळातच उत्तम अभिनेता आहे आणि या चित्रपटात त्याने लिंगबदल करून घेतलेल्या तरुणीची गुलची भूमिका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकतर ते या भूमिकेत सहज ओळखू येणार नाहीत, इतक्या सुंदर आणि सहजतेने गुल म्हणून वावरले आहेत. एरवी स्त्रीचे कपडे अंगावर चढवून, चेहऱ्याला रंगरंगोटी करून लाडे लाडे बोलणे आणि अचकट विचकट चाळे करणाऱ्या पुरूष कलाकारांचा किळसवाणा अभिनय पाहण्याची आपल्याला सवय आहे. मात्र, दीपक दोब्रियाल यांनी खूप संयत पध्दतीने आणि कुठेही आपण अशापध्दतीची काही वेगळी भूमिका साकारतो आहे असा अभिनिवेश न बाळगता गुल ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांना अधिक काही करण्याची संधी मिळाली असती तर खरोखरच प्रेक्षकांना वेगळं काही पाहता आलं असतं. पण वेडेपणाच्या या गोंधळात अशा काही शहाण्यासुरत्या छोटेखानीच गोष्टी या चित्रपटात आहे. खो खो हसायला लावणारा विनोद चित्रपटात नसला तरी या काही मोजक्या कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शकाच्या मांडणीमुळे हा चित्रपट आचरटपणाच्या वळचणीला गेलेला नाही हा एकमेव चांगला अनुभव.

सन ऑफ सरदार २

दिग्दर्शक – विजय कुमार अरोरा

कलाकार – अजय देवगण, मृणाल ठाकूर, कुब्रा सईत, दीपक दोब्रियाल, रवी किशन, मुकुल देव, चंकी पांडे, विंदू दारासिंह, रोशनी वालिया, अश्विनी काळसेकर.