नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्याचा उद्यानातील अधिकाऱ्यांचा निर्धार
मुंबईत सिमेंटच्या जंगलात कधीकाळी गॅलरीत ऐकू येणारा हा चिवचिवाटही आता बंद होत चालला आहे. जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने सोमवारी झालेल्या सर्वेक्षणात चिमण्यांचा हा चिवचिवाट कमी होण्यामागे त्यांचा नष्ट होत चाललेला नैसर्गिक अधिवास हे प्रमुख कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पहिल्यांदा या चिमण्यांना त्यांची घरटी बांधण्यासाठी नैसर्गिक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्धार ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’च्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून अंधेरीतील भवन्स महाविद्यालयात शिकणाऱ्या अक्षय शिंदे, आराध्या सरदेसाई, निखिल प्रधान आणि अमेय लाड या चार विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले. ‘हाऊस स्पॅरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिमण्या आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतात. या विद्यार्थ्यांनी भवन्सच्या प्रांगणात तीन तास केलेल्या निरीक्षणात त्यांना एकू ण ९६ चिमण्या आढळून आल्या. हाच आकडा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कृष्णगिरी उपवन परिसरात ६९ एवढा होता. जंगलातील चिमण्यांपेक्षा शहरात येणाऱ्या ‘हाऊस स्पॅरों’ची संख्या जास्त असल्याचे त्यांना या सर्वेक्षणात दिसून आले. मात्र त्याचवेळी या चिमण्यांची संख्या घटत चालली असल्याचेही यातून दिसून आले. मात्र त्यांची संख्या घटण्यामागे मोबाइल टॉवरसारखी कारणे नाहीत. तर या चिमण्यांचा शहरातला नैसर्गिक अधिवास कमी झाला आहे. सगळीकडे सिमेंट-काँक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्याने चिमण्यांना या इमारतींमध्येच घरटी बांधावी लागतात. त्यांना घरटे बांधण्यासाठी गवत, चारा याची गरज असते. मात्र शहरात या गोष्टी सहजी सापडत नसल्याने त्यांना घरटे बांधण्यासाठी अडचणी येतात. परिणामी त्यांची संख्या घटत चालली आहे, हे लक्षात घेऊन चिमण्यांना नैसर्गिक गोष्टींचा वापर करून घरटी बांधून देण्याचा विचार ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यासाठी दोन टप्प्यांमध्ये काम सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूरचे सेमिनरी हिल्स, औंरगाबादची फॉरेस्ट कॉलनी, चंद्रपूर येथील रामबाग फॉरेस्ट कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या चार ठिकाणी चिमण्यांची गणना करण्यात येईल.
संख्या घटीचा अभ्यास
संबंधित परिसरात झाडांवर किंवा इमारतींमध्ये त्यांना नैसर्गिक पद्धतीची घरटी बांधून देणे, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या मदतीने चिखल असलेली डबकी, गवत आणि खाणे उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या संख्येवर कशाकशा प्रकारे परिणाम होतो हे अभ्यासणे या पद्धतीने पहिल्या टप्प्यात काम करण्यात येणार आहे. हा टप्पा यशस्वी झाला तर दुसऱ्या टप्प्यात आणखी काही परिसरात हे काम वाढवण्यात येणार आहे.