हिवाळी अधिवेशनातच अध्यक्ष निवड -पटोले

विधानसभा अध्यक्षाची निवड ही आवाजी मतदानाने करण्याची पद्धत देशातील सर्वच राज्यांमध्ये आहे.

Congress-Nana-Patole
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (संग्रहित छायाचित्र)

मुंबई: विधानसभा अध्यक्षांची निवड विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातच होईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील, असे त्यांनी सांगितले.

करोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अधयक्षपदाच्या  निवडणूक  प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो,  त्यामुळे अध्यक्षाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र अध्यक्षाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल, असे पटोले म्हणाले. 

विधानसभा अध्यक्षाची निवड ही आवाजी मतदानाने करण्याची पद्धत देशातील सर्वच राज्यांमध्ये आहे. आपल्याकडे गुप्त मतदान पद्धतीने मतदान होत असे. पण नियमात बदल केल्याने राज्यातही विधानसभा अध्यक्षाची निवड ही आवाजी मतदानाने होईल, असे पटोले यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनातच अध्यक्षांची निवड केली जाईल, असे पटोले हे सांगत असले तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल. पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने मागणी करूनही महाविकास आघाडीतील दोन मित्र पक्षांनी त्याला दाद दिली नव्हती.

भाजपने देशासाठी काय केले ?

अमरावती दंगलीप्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असे पटोले म्हणाले. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे, बलिदान दिले आहे, भाजपने देशासाठी काय केले, असा सवाल त्यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Speaker of the legislative assembly will elect in winter session nana patole zws

ताज्या बातम्या