दिशा काते, लोकसत्ता

मुंबई : लक्ष्मीपूजन, पाडवा तसेच भाऊबीजेसाठी ज्याला भेट द्यायची आहे, त्याची आवड, व्यक्तिमत्व लक्षात घेऊन अनुषंगाने भेटवस्तू तयार करून घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यामुळे कारागीर अशा निर्मितचा आवर्जून विचार करीत आहेत.

दिवाळी काही दिवसांवर आल्याने बाजारपेठेत खरेदीला वेग आला आहे. नातेवाईक, मित्रमंडळीसाठी भेटवस्तू खरेदीची लगबग सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे बाजारात मिठाई, चॉकलेट, सुकामेवा, सुगंधी साबण, अत्तरे बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. यंदा हस्तकलेच्या वस्तू, घरगुती तयार केलेली प्रसाधने यांना विशेष मागणी आहे.

बाजारात मिळणाऱ्या मोठय़ा कंपन्यांच्या उत्पादनांतील साचेबद्धपणा बाजूला सारून बांधेसूद मथळा आणि मजकुरातील एखादे शुभेच्छा पत्र किंवा आकर्षक वस्तूचे, त्यातील घटकांचे पारंपरिक स्थान त्याची महत्त्व सांगणारे पत्रक असे घटक ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

हेही वाचा >>> शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प २०२५ अखेरीस

ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तूमध्ये मिळणारे पर्याय यांमुळे घरगुती तयार केल्या जाणाऱ्या वस्तुंच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा राहिलेला आहे. बाजारात उपलब्ध असणाऱ्या तयार वस्तू निवडताना ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार बदल करण्याची संधी फारशी नसते. मात्र, काही दिवस अगोदर मागणी नोंदवून हस्तकलेच्या वस्तू बनविणाऱ्यांकडे आवडीनुसार वस्तू, रंगसंगती, सुगंध असे पर्याय निवडण्याची संधी असते. भेटवस्तू किंवा खाद्यपदार्थ, सुकामेवा, चॉकलेट देण्यासाठीचे आकर्षक डबेही मागणीनुसार तयार करून मिळतात. खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, साबण, दागिने, विणकाम केलेले कपडे, बॅग, वेगवेगळय़ा प्रकारच्या तयार रांगोळय़ा अशा अनेक पर्याय उपलब्ध आहेत. घर सजावटीच्या वस्तूंमध्ये काष्टशिल्प, कागदी फुले, वाळवलेली नैसर्गिक फुले, पेंटिंग केलेल्या कापडाच्या वस्तू यांनाही मागणी आहे. प्रामुख्याने समाजमाध्यमांवरून या उत्पादनांची खरेदी-विक्ी मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरणपूरक उत्पादने स्थानिक दुकांनांमध्ये दिवाळीसाठी केलेल्या स्वतंत्र कक्षात या वस्तूंना स्थान मिळाल्याचे दिसते. दुकानदारांकडून माहितीतल्या, स्थानिक कारागिर, कलाकार, उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तू आवर्जून विकत घेण्यात येत आहेत. दिवाळीला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी सध्या हस्तकलेच्या वस्तूंची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. ग्राहक आवर्जून वेगवेगळय़ा वस्तूंसाठी मागणी नोंदवत आहेत. शिवाय यातील बहुतेक उत्पादने पर्यावरणपूरक असल्यानेही त्याचा आवर्जून विचार होत आहे, असे व्यावसायिक अरुण द्विवेदी यांनी सांगितले.