मध्य रेल्वेवरील गर्दी, तिकिटांसाठीचा विलंब टाळण्यासाठी उपाय; २७ स्थानकांत ६८ कक्ष

उपनगरीय रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने एटीव्हीएमसाठी (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन) स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ उपनगरीय स्थानकात ६८ कक्ष उभारले जातील. यामुळे तिकीट देतानाचा विलंब व गर्दी टाळता येणे शक्य होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेल्वे स्थानकात येताच प्रवाशाला मुख्यत्वे लोकलचे तिकीट मिळवताना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. तिकीट खिडक्यांसमोर असलेल्या रांगांमधून सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने दोन रुपये जादा दर आकारून झटपट सुविधा देणारी जनसाधारण तिकीट बुकिंग यंत्रणा आणली. त्यानंतर एटीव्हीएम सुविधा आणि मोबाइल तिकिटेही सेवेत आली. यात एकूण काढल्या जाणाऱ्या तिकिटांमध्ये २५ ते ३० टक्के तिकिटे एटीव्हीएम मशीनमधून काढली जातात. सध्या मध्य रेल्वेवर ६०२ मशीन्स आहेत. मात्र या मशीन्स तिकीट खिडक्यांच्या बाजूला किंवा स्थानकात अन्य ठिकाणी उभ्या केलेल्या असतात. या मशीनसमोरच होत असलेल्या गर्दीमुळे स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या अन्य प्रवाशांनाही मनस्ताप होतो. स्थानकातील गर्दी टाळतानाच प्रवाशांनाही तिकीट  एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने एटीव्हीएमसाठी विशेष स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. स्थानकात एका दिशेला किंवा अन्यत्र हे कक्ष उभारून त्यात चार ते पाच मशीन्स ठेवल्या जातील. एकाच रांगेत प्रवाशांना या मशीनमधून तिकीट उपलब्ध व्हावे, तशी व्यवस्थाही केली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. २७ स्थानकात ६८ स्वतंक्ष कक्ष उभारले जाणार आहेत.

सध्या सीएसएमटी स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्धही केली जात आहे. या कक्षात रेल्वेकडून जाहिरातही केली जाणार असून त्यामुळे वर्षांला २४ लाख रुपयांचे उत्पन्न उद्दिष्टही ठेवले आहे.

कोणत्या स्थानकात किती कक्ष?

*  विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, मुंब्रा, दिवा, डोंबिवली स्थानकांत प्रत्येकी दोन

*  एलटीटी, सॅण्डहर्स्ट रोड, मशीद, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, नाहूर, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांत प्रत्येकी एक

*  सीएसएमटी व घाटकोपर स्थानकांत प्रत्येकी चार

*  दादर, सायन, मुलुंड व कळवा स्थानकांत प्रत्येकी तीन

*  कुर्ला स्थानकात सहा, कांजूरमार्ग स्थानकात चार

ठाणे आणि कल्याण स्थानकांत प्रत्येकी सात