भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सुविधा देण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाने तयारी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. या दिवशी रेल्वेतर्फे ५ आणि ६ डिसेंबर रोजी विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
दिनाच्या तयारीसंबंधीच्या आढावा बठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी चत्यभूमीवर येतात. त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्याबरोबरच कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या वर्षी अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करून या दिवसाचे पावित्र्य राखण्यात यावे, यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. या वेळी महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी सुविधांची माहिती दिली. पिण्याच्या पाण्याचे नळ तसेच टँकर, बंदिस्त व फिरती शौचालये, रुग्णवाहिका तेथे असतील.