ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेच्या कामाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वेग दिला आहे. आतापर्यंत या मार्गिकेचे ६३ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता कशेळी खाडी येथे बॉक्स गर्डर सेगमेंट बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी पहिले सेगमेंट यशस्वीपणे बसविण्यात आले. आता येत्या काळात कशेळी खाडीवर असे एकूण १९५ सेगमेंट बसविण्यात येणार आहेत.

हेही वाचा- शिंदे गटाविरोधात फलकबाजी; नवरात्र मंडळाचे फलक पोलिसांनी हटवले

२०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न

ठाणे-भिवंडी-कल्याण २५ किमी लांबीच्या मार्गिकेच्या कामाला दोन टप्प्यात एमएमआरडीएकडून २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली. एकूण १५ स्थानकांचा समावेश असलेल्या आणि रु. ८५१६.५१ कोटी खर्चाच्या या मार्गिकेचे काम २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने कामाला वेग दिला असून प्रकल्पातील महत्त्वाच्या, अवघड अशा कशेळी खाडी येथे बॉक्स गर्डर सेगमेंट बसविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. असे १९५ सेगमेंट येथे बसवण्यात येणार आहेत. हा प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न एमएमआरडीएचा आहे.