‘जुने ते सोने’ ही म्हण असली, तरी सध्या एसटीच्या दप्तरी असलेल्या काही जुन्या नोंदी-निकष एसटीसाठी आतबट्टय़ाच्या ठरत आहेत. एसटीच्या दप्तरी मार्गावरील किलोमीटरच्या नोंदी या रस्त्यावरील ‘मैलाच्या दगडां’च्या आधारे असून प्रत्यक्षात एसटीच्या बसगाडय़ा त्यापेक्षा कित्येक किलोमीटर जास्त धावतात. परिणामी, अपेक्षेपेक्षा जास्त डिझेल तर जळतेच शिवाय प्रवासी उत्पन्नाचेही गणित चुकते. त्यातून एसटी महामंडळाला दरवर्षी सुमारे ४५० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा फटका बसत आहे.
एसटीच्या गुहागर आगारातील गाडय़ा आखून दिलेल्या किलोमीटरपेक्षा जास्त किलोमीटर चालत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता एसटीच्या दप्तरी असलेल्या किलोमीटरच्या नोंदी चुकीच्या असल्याचे आढळले. एसटीने अनेक वर्षांपूर्वी रस्त्यांवरील मैलाच्या दगडांचा आधार घेत आपल्या मार्गाचे किलोमीटर निश्चित केले होते. मात्र प्रत्यक्षात गाडय़ांवरील ‘मायलेज’च्या आकडय़ांचा आधार घेतला असता एसटीच्या गाडय़ा त्या किलोमीटरपेक्षा कित्येक किलोमीटर अधिक धावत असल्याचे लक्षात येते.
एसटीच्या दप्तरी जुन्याच नोंदी आहेत. मात्र या नोंदींवरील किलोमीटरचे आकडे फसवे असल्याने एसटीच्या गाडय़ांना डिझेल जास्त लागते. या डिझेलचा हिशोब द्यावा लागतो. तसेच जास्तीच्या किलोमीटरची नोंद नसल्याने त्यावर प्रवासी भाडेही आकारले जात नाही. परिणामी एसटीचे दुहेरी नुकसान होत आहे. गुहागर विभागातील काही गाडय़ा या नियोजित किलोमीटरपेक्षा ४०-४५ किलोमीटर जास्त धावतात. हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले.
प्रत्यक्ष अंतर आणि एसटीचा प्रवास यांच्यात तफावत असल्याची तक्रार आली आहे. ४०-४५ किलोमीटरची तफावत नक्कीच मोठी आहे. एवढय़ा किलोमीटरवरील उत्पन्न सोडणे एसटीला परवडणारे नाही. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे एसटीचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले.
गुहागर आगारातील वस्तुस्थिती
बस मार्ग                          प्रत्यक्ष किमी   एसटीचे किमी    तफावत
गुहागर-तवसाळ-मुंबई           ८८४                 ८४६           ३८
गुहागर-भातगाव-परळ           ९४६                 ८६३           ८३
गुहागर-कोल्हापूर                   ४८१                 ४३६           ४५
गुहागर – मिरज                      ४९०                 ४६२           २८
गुहागर-पुणे (स्वारगेट)           ५९४                 ५६८          २६
गुहागर-चिपळूण-रत्नागिरी    १४२                 १३५           ०७