मुंबई: निवृत्तीवेतन, उपदानाचा (ग्रॅच्युईटी) लाभ द्यावा आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई नको, असे आदेश न्यायालयाने एसटी महामंडळाला दिल्यानंतर आझाद मैदानात उपस्थित कर्मचाऱ्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. संप मागे घ्यायचा की नाही हे न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत आल्यावरच ठरवू, असे संपकरी कर्मचाऱ्यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदान येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

एसटी संपावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने सोमवारपासूनच राज्यातील विविध भागातून एसटीचे कर्मचारी आझाद मैदानात दाखल झाले. यामध्ये महिला कर्मचारीही मोठय़ा प्रमाणावर होत्या. सुनावणीनंतर आझाद मैदानात उपस्थित हजारो कर्मचाऱ्यांनी गुलाल, भंडारा उधळून जल्लोष केला. संप मागे घेण्याची तारीख, वेळ, ठिकाण हे न्यायालयाच्या निकालाची प्रत आल्यावरच ठरवू, असे संपकऱ्यांचे वकील सदावर्ते यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यानंतर एसटी महामंडळाकडून ११ हजार कंत्राटी चालकांसाठी निविदा काढली जाणार होती. मात्र ही निविदा २२ एप्रिलपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे किती कर्मचारी पुन्हा रुजू होतात ते पाहूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे, ते न झाल्यास सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, वेतन वेळेवर देण्याची हमी शासनाने घ्यावी, एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाया मागे घेण्यात याव्या, अशा प्रमुख मागण्या घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ संप पुकारला. त्यामुळे राज्यातील एसटी सेवा ठप्प झाली आणि प्रवाशांचे हाल झाले.

संपाचे फलीत काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकालानंतर आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. विलीनीकरण होणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यात सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाच्या मागणीवर अद्यापही विचार झालेला नाही. हे पाहता कर्मचाऱ्यांची विलीनीकरण आणि सातव्या वेतन आयोगनुसार वेतन यासारख्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या नाही.