“हवं तर पाया पडतो पण तुम्ही…”; एसटी कर्मचाऱ्यांची राज ठाकरेंकडे कळकळीची विनंती

संपूर्ण महाराष्ट्र दिवाळी साजरी करत असताना आम्ही मात्र दिवाळीला दारात बसून होतो, असं या कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी सांगितलं.

Raj Thackeray ST Workers (1)
राज ठाकरेंसमोर एसटी कर्मचाऱ्यांनी मांडलं आपलं म्हणणं

राज्यामध्ये मागील दोन आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर आज एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडतानाच, केवळ राज ठाकरेच हा प्रश्न सोडवू शकतात असं म्हणत या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती त्यांच्याकडे केली. हताश झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कळकळीची विनंती करत अगदी पाया पडतो पण हा प्रश्न सोडावा असंही राज यांना म्हटलं.

एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत संप मागे घेण्याचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. मात्र या साऱ्या गोंधळादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रतिनिधी मंडळाने आज राज यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य अगदी कळकळीने राज यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सांगत होते.

आम्ही महाराष्ट्राची सेवा करतोय
“आम्ही महाराष्ट्राची सेवा करतोय, महाराष्ट्राला जोडतोय. पण दरवेळी आमच्या पगाराच्या वेळेस पैसे कसे नसतात. आता या १२ दिवसांच्या संपानंतर विलीनीकरण समिती स्थापन झाली, कोर्टाची पुढची तारीख आली आणि हाती काही लागलं नाही तर बायकोला काय सांगायचं?,” अशा शब्दांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधिक मंडळाने राज यांच्यासमोर व्यथा मांडली.

…तर ३७ आत्महत्या झाल्यात त्याचा आकडा ३१७ असेल
हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव मांडा, अर्थसंकल्पात तरतूद करा. आता पगार नाही मिळाला आणि अन्याय झाला तर ३७ आत्महत्या झाल्यात त्याचा आकडा ३१७ असेल, अशी भितीही या अधिकाऱ्यांनी राज यांच्यासमोर व्यक्त केली.

दिवाळीला दारात बसून होतो…
“साहेब, दिवाळी झाली नाही आमच्या घरी. संपूर्ण महाराष्ट्र दिवाळी साजरी करत अशताना आम्ही मात्र दिवाळीला दारात बसून होतो. आता हा प्रश्न फक्त तुम्हीच सोडवू शकता. हवं तर पाया पडतो पण तुम्ही हा प्रश्न सोडवून द्या. विलीनीकरण कधी करायचं ते करा पण आयोग लागू करा,” असं एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी राज यांना म्हटलं आहे.

आम्ही एक महिना घ्यायला तयार आहोत
“आता पगार नाही वाढला तर काय करणार? आधीच १२ दिवस विदआऊट पे झालं आहे. विलीनीकरण न्यायालयाची तारीख येईल फटाके वाजतील. पण हाती कहीच आलं नाही तर काय? त्यामुळे आयोग लागू करा आणि नंतर विलीनीकरण करा अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारच्या निर्वाचनाला जो पगार देता तोच आम्हाला द्या. सरकार विलीनीकरणासंदर्बात तीन आठवडे मागतंय आम्ही एक महिना घ्यायला तयार आहोत,” असंही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधिक मंडळाने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय. हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव मांडून केंद्राकडे पाठवून आणि विलीनीकरण करु घेण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी या प्रतिनिधिंनी राज यांच्याकडे केली.

राज यांनी ठेवली अट…
यावेळी राज ठाकरे यांनी भेटीच्या सुरुवातीलाच आत्महत्या न करण्याची अट कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसमोर ठेवली. राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याचसंदर्भात राज यांनी या बैठकीच्या सुरुवातीलाच चिंता व्यक्त केल्याचं पहायला मिळालं. “मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल,” असं राज यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी स्पष्ट शब्दांमध्ये कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाला सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St workers meet raj thackeray says mns chief is only leader who can solve this problem scsg

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या