राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घाराबाहेर आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन (ST Workers Protest) केलं. यावेळी पवारांच्या सिल्व्हर ओक या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या. या साऱ्या प्रकारामुळे सिल्व्हर ओकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगलाच गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. या घटनेसंदर्भात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. असं असतानाच राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय.

नक्की पाहा >> सिल्व्हर ओक आंदोलन Video: पोलीस कर्मचारी आंदोलनकर्त्या महिलेला धक्का देत असतानाच सुप्रिया सुळेंनी तिचा हात पकडला अन्…

फडणवीस यांनी हा हल्ला चुकीचा आहे असं म्हटलंय. तसेच अशी आंदोलने एखाद्या मोठ्या नेत्याच्या घरापर्यंत जाणं समर्थनीय नसल्याचं फडणवीस म्हणालेत. फडणवीस यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिय नोंदवली आहे. पवारांच्या घरासमोर झालेल्या गोंधळावर भाजपाकडून प्रतिक्रिया देणारे फडणवीस हे पहिले मोठे नेते आहेत.

“ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मात्र एकीकडे पवारांच्या घरासमोरील गोंधळाचा निषेध करतानाच दुसरीकडे फडणवीस यांनी सरकारचेही कान टोचलेत. “गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो,” असंही म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचे आदेश दिलेत.