राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यातील १६ जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी प्राणवायूची देखील मागणी वाढत आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या पुरवठय़ात २०० मेट्रिक टन प्राणवायूचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. तसेच द्रवरूप प्राणवायूच्या वाहतुकीसाठी १० टँकर्स राज्याला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मंगळवारी राज्य सरकारने केंद्राकडे केली.

ग्रामीण भागात करोनाचा उद्रेक होत असून राज्याला वाढीव प्राणवायूची गरज असून त्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिले होते. त्यानुसार कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून वाढीव प्राणवायूची मागणी के ली आहे.

राज्यासाठी दिलेला प्राणवायू आणण्याची सुविधा राज्याच्या सोयीची असावी. यापूर्वी नेमून दिलेले ओडिशा येथील आरआयएनएल, वैझाग आणि जिंदाल स्टिल येथील प्राणवायू उपलब्धतेचे नियोजन कागदावर राहिले आहे. तसेच सध्या गुजरात जामनगर येथून दिवसाला १२५ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा होत असून त्यात १०० मेट्रिक टनाने वाढ करून दिवसाला २२५ मेट्रिक टन आणि भिलाई येथून २३० मेट्रिक टन पुरवठा व्हावा, अशी विनंतीही मुख्य सचिवांनी केली. भौगोलिकदृष्टय़ा ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कालावधी कमी होण्यास मदत होतानाच रुग्णांना वेळेवर प्राणवायू देण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. द्रवरूप प्राणवायूच्या वाहतुकीसाठी सिंगापूर, दुबई व अन्य देशांतील तेल उत्पादक कंपन्यांकडून केंद्र शासनाला आयएसओ टँकर्स मिळाले आहेत. त्यातील किमान १० टँकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून ओडिशातील अंगुल येथून रोरो सेवेच्या माध्यमातून प्राणवायू आणणे सोपे होईल, असेही मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.

१६ जिल्ह्य़ांतील रुग्णसंख्येत वाढ

राज्यात सध्या ६ लाख ६३ हजार ७५८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ७८ हजार ८८४ रुग्ण प्राणवायूवर असून २४ हजार ७८७ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्य़ांमध्ये सातत्याने सक्रिय रुग्णसंख्या वाढत असल्याने प्राणवायूच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्य़ांत प्राणवायूचे लेखापरीक्षण केले जात आहे. प्राणवायूची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता सध्या केंद्र शासनाकडून होत असलेल्या प्राणवायू पुरवठय़ात २०० मेट्रिक टनांची वाढ करण्यात यावी, अशी विनंती कुंटे यांनी के ली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government demand to the center over supply of additional 200 metric tons oxygen zws
First published on: 05-05-2021 at 02:56 IST