मुंबई: भाजपसह विविध स्तरांतून होणाऱ्या विरोधाला न जुमानता राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयावर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
त्यानुसार सुरुवातीस सुमारे ६०० ठिकाणी वाइन विक्रीला उपलब्ध होईल असे सांगण्यात आले. राज्यात सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाने घेतला होता. मात्र महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या या निर्णयास विरोध केला होता. त्यानंतर भाजपने राज्यभरात या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला असून सामाजिक क्षेत्रातूनही या निर्णयास विरोध होत आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकार वाइनबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मागील मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त कायम करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर आले त्या वेळी भाजपच्या विरोधाला न जुमानता या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार इतिवृत्त मंजूर करण्यात आले. त्यामुळे सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीचा मार्ग मोकळा झाल्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. राज्यात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे, माजी मंत्र्यांचे बार आहेत.
भाजप नेत्यांचीच अधिक प्रमाणात दारूची दुकाने असून काही भाजप नेत्यांचे दारूचे कारखानेही आहेत. भाजपचा दारूला इतका विरोध आहे, तर त्यांनी सगळय़ाचे परवाने जमा केले पाहिजेत. भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात तर घरात बार उघडायला परवानगी दिली आहे. दारू पिणारे त्यांच्याच पक्षात अधिक असल्याचा आरोपही मलिक यांनी केला, तर राज्यात जेमतेम ६०० ठिकाणी वाइन विक्रीची दुकाने सुरू होतील, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
सरकारकडून नियमावली..
राज्यात ज्या वायनरी वाइन तयार त्यांना थेट सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये स्वत: खरेदी करण्याची सुविधा असलेले शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.
किमान १०० चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या नोंदणीकृत असलेलेच सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्येही केवळ वाइन विक्रीस परवानगी मिळणार आहे. मात्र शैक्षणिक व धार्मिक स्थळांजवळ असलेल्या सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करता येणार नाही. या दुकानांना वाइन विक्रीचा परवाना घ्यावा लागणार असून त्यासाठी वार्षिक पाच हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
फक्त सुपर मार्केटमध्येच वाइन उपलब्ध होईल. किराणा दुकानांमध्येही वाइनची विक्री होणार, असा अपप्रचार काही जणांनी सुरू केल्याचे सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही किराणा दुकानांमधून वाइनची विक्री होणार नाही, असे स्पष्ट केले होते.
गावोगावी आंदोलन-चंद्रकांत पाटील
मुंबई : आम्ही पीत नसल्याने वाइन आणि दारूमधील फरक समजत नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच तो समजावून सांगावा, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. किराणा दुकानांमध्ये वाइन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दु:ख झाले असले, तरी या निर्णयाविरोधात गावोगाव महिला रस्त्यावर उतरतील, असे त्यांनी सांगितले.