पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यानच्या स्थानकाचे नाव अखेर ठरले आहे. राज्य सरकारने या स्थानकाचे नाव राममंदिर असे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. स्थानिक संघटनेने या स्थानकाचे नाव राममंदिर ठेवण्याची मागणी केली होती.

वाढत्या नागरिकरणाकडे पाहता जोगेश्वरी आणि गोरेगाव या दरम्यान ओशिवरा भागाजवळ नवीन स्थानकाची उभारणी मुंबई रेल्वे विकासमहामंडळाने केली. या स्थानकामुळे पूर्व-पश्चिम भागाला जोडणारे रेल्वे फाटक बंद करावे लागले. त्यामुळे येथे उड्डाणपूल बांधण्यात आला. या उड्डाणपुलाचे काम दोन वर्षे रखडल्याने हे स्थानक सुरू करण्याचे अनेक मुहूर्त याआधी हुकले होते. पश्चिम रेल्वेने अखेर २७ नोव्हेंबररोजी या स्थानकाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.दरम्यान, या स्थानकाला जवळच असलेल्या पुरातन राम मंदिरावरून ‘राम मंदिर’ स्थानक असे नाव द्यावे, अशी मागणी वीर सेना नावाच्या एका संघटनेने केली होती. या भागातील रहिवाश्यांच्या विविध दाखल्यांवरही राम मंदिराचा उल्लेख आहे. हे राम मंदिर २५० वर्षे जुने असल्याने या मंदिराचेच नाव स्थानकाला द्यावे, असे सांगण्यात आले होते.

भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानकाला राममंदिर नाव द्यावे यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडेही पाठवण्यातआला होता. रेल्वे स्थानक बांधून पूर्ण झाले असले तरी नावाच्या वादामुळे उद्घाटन काही होत नव्हते. रविवारी या स्टेशनचे उद्घाटन होईल अशी घोषणा पश्चिम रेल्वेने केली होती. पण नावाचा तिढा कायम होता. अखेर  शुक्रवारी संध्याकाळी राज्य सरकारने स्टेशनला राममंदिर हे नाव देण्यास मंजुरी दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. राज्य सरकारने नाव दिले असले तरी रविवारी उद्घाटन होण्याची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.