सुशांत मोरे, लोकसत्ता

मुंबई : राज्यातील सर्वच पक्षांना आणि नेत्यांना शिवरायांचे राज्य आणि त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा दाखला सातत्याने देण्यात स्वारस्य वाटते. मात्र त्यांच्या पंचवीस फुटी अश्वारुढ पुतळय़ाची उभारणी ऐतिहासिक स्थानकाजवळ करण्याच्या निर्णयानंतरही तीन वर्षे काहीच घडले नाही. पुतळय़ावरून फक्त राजकारण रंगले. पुतळा तयार झाल्यानंतर रेल्वेच्या डेपोत अडगळीत ठेवण्यात आला असून रेल्वेने धोरण बदलल्यामुळे या पुतळय़ाचे काय करायचे  हा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला आहे.

कोणताही सरकारी कार्यक्रम, राजकीय सभा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुरू होते. महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण करण्यात सर्वच पक्षांमध्ये उत्साह असतो. मात्र राजकीय हेतू सरला, की मूळ मुद्दय़ाचा आणि महाराजांचाही कसा विसर पडतो याचे ‘मूर्तिमंत’ उदाहरण मध्य रेल्वेच्या सँडहस्र्ट रोड येथील गुड्स डेपोत पाहायला मिळत आहे.

सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक १८ बाहेरील रेल्वेचा परिसर ओसाड आहे. खूप मोठय़ा अशा या परिसरात मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांना सोडण्यासाठी खासगी वाहने येतात. तेथे सीएसएमटी-कुर्ला पाचवा आणि सहावा मार्ग प्रकल्पांतर्गत फलाटाबाहेरील परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय २०१७ मध्ये रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वेने घेतला होता. यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय झाला होता.

हा पुतळा सीएसएमटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच बसविण्याची मागणी त्यावेळी काही लोकप्रतिनिधींनी केली. पुतळा कुठे उभा करावा यावरून वाद, राजकारण रंगले. अखेर एक कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा पुतळा आकारास आला. या कामांसाठी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सच्या अखत्यारीत पाच जणांची समितीही स्थापन करण्यात आली. शिवरायांच्या पुतळय़ांच्या दोन प्रतिकृती बनविण्यात आल्या. यासंदर्भात दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सच्या समितीने चर्चा केल्यानंतर महाराजांच्या पुतळय़ात बदल करण्यात आले. त्यानंतर अश्वारूढ पुतळा उभा करण्यावर शिक्कामोर्तब करून २०१८ मध्ये पुतळय़ाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर काही महिन्यांतच पुतळा उभा राहिला. पुतळय़ाचे फायबरचे काम साधारण सहा ते सात महिन्यांत पूर्ण झाले आणि त्यानंतर त्याला धातूचा मुलामा देण्यात येणार होता, मात्र या अंतिम टप्प्यावर रेल्वेकडून काम थांबविण्यात आले.

काय झाले?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय २०१७मध्ये झाला. २०१८ साली पुतळ्याचे काम सुरू झाले. हा पुतळा तयार होऊन तीन वर्षे उलटूनही सँडहस्र्ट रोड येथील पी.डी’मेलो रस्त्यालगत रेल्वेच्या बंद शेडमध्ये पडून आहे.

पुतळय़ाविषयी..

या पुतळय़ाचा चौथरा दहा ते बारा फुटांचा करण्याचे नियोजन होते. त्यामुळे पुतळय़ाची उंची जवळपास २० ते २५ फूट होणार होती. चौथऱ्यावर शिवरायांचे जीवनचरित्र उलगडणारे प्रसंग साकारण्यात येणार होते. पुतळ्यासाठी एक कोटी रुपये खर्च झाला.

निर्णय मागे? रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या सध्याच्या धोरणानुसार, प्रतिष्ठित व्यक्तींचे पुतळे, फलक, स्मारके आणि भित्तीचित्रे बसवण्यासाठी रेल्वे परिसर योग्य जागा मानली जात नाही. त्यामुळे पुतळे उभारू नयेत असे धोरण निश्चित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार झाल्यानंतर हे धोरण तयार करण्यात आले. त्यामुळे महाराजांचा पुतळा उभारणीचा निर्णय मागे पडला. आता या पुतळय़ाचे काय करावे, असा प्रश्न रेल्वेलाही पडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुतळा उभारण्याबाबतचा निर्णय उच्च स्तरावरचा आहे. सर्व सूचनांचे आणि यासंबंधी धोरणाचे पालन रेल्वे क्षेत्रीय आणि मंडळ स्तरावर केले जाते. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे