ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल परिसरांतील प्रमुख प्रकल्प नवीन वर्षांत

मुंबई : नवीन वर्षांत एकीकडे मुंबईतील दोन मेट्रो मार्ग सेवेत येत असताना ठाणे आणि आसपासच्या महानगर क्षेत्रालाही जलद वाहतुकीचे वेध लागले आहेत. या पट्टय़ातील मेट्रो प्रकल्प नवीन वर्षांत कार्यान्वित होण्याची शक्यता धूसर असली तरी, काही प्रमुख मार्ग आणि प्रकल्पांची कामे २०२२मध्ये पूर्ण होतील, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

माणकोली-मोटागाव खाडीपूल

ठाणे ते डोंबिवली दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत एका तासाची बचत करणाऱ्या माणकोली-मोटागाव मार्गावरील सहापदरी पुलाचा पोहोच रस्ता (खाडी पूल) बांधण्याचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. १.३ किमी लांबीचा, सहा मार्गिकेचा, २७.५ मीटर रुंद असा हा खाडीपूल आहे. या खाडीपुलाचे भूमिपूजन २०१६ मध्ये करण्यात आले होते. हे काम ३६ महिन्यांमध्ये म्हणजे एप्रिल २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम रखडले. आता जून २०२२ मध्ये काम पूर्ण होईल आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा करण्यात आला आहे. हा पूल खुला झाल्यास ठाणेकर आणि डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोपरी पूल

मुंबई आणि ठाणे शहरांना जोडण्यासाठी एमएमआरडीएने कोपरी पुलाचे काम हाती घेतले आहे. या पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. हा टप्पा नव्या वर्षांत एमएमआरडीए वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

तळोजातील अंतर्गत रस्ते सुधार प्रकल्प

 मागील काही वर्षांपासून तळोजा परिसराचा झपाटय़ाने विकास होत आहे. परिणामी, परिसरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या या परिसरातील अवजड, माल वाहतुकीच्या वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे एमएमआरडीएने येथील रस्ते सुधारण्यासाठी प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार अरुंद रस्ते रुंद करणे, नवीन रस्ते बांधणे, रस्त्यांची दुरुस्ती आदी कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे या वर्षी पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरच तळोजातील प्रवासही सुकर होणार आहे.