विलेपार्ले येथील प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली राजस्थानमधील एका विद्यार्थ्याची फसवणूक केल्याप्रकरणी फेरीन हर्षदभाई पटेल ऊर्फ गबानी (३०) याला जुहू पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सहा महिन्यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

तक्रारदार आदित्य विनोद माथूर (१९) हा मूळचा राजस्थानमधील जयपूर येथील रहिवासी आहे. पुढील शिक्षणासाठी तो राजस्थानहून एप्रिल २०२२ मध्ये मुंबईत आला होता. यावेळी तो मुंबईत व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेत होता. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने तो त्याच्या मित्रासोबत विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. तिथेच त्यांची ओळख फेरीनसोबत झाली. या ओळखीनंतर ते तिघेही चांगले मित्र झाले होते. २५ एप्रिल २०२२ रोजी फेरीन त्याच्या खोलीमध्ये आला होता. विलेपार्ले येथील प्रसिद्ध महाविद्यालयात ओळख असून त्याला महाविद्यालयात  प्रवेश मिळवून देतो असे फरीनने त्याला सांगितले. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत असल्याने आदित्यही तयार झाला. त्यासाठी त्याला त्याचे शैक्षणिक कागदपत्रे, छायाचित्र आणि आगाऊ प्रवेश शुल्क म्हणून काही रक्कम दिली होती. मे महिन्यात त्याचा प्रवेश झाला असून दोन दिवसांत प्रवेश शुल्क रक्कम जमा करावी लागेल असे फरीनने आदित्यला सांगितले. त्यामुळे त्याने एटीएममधून ८२ हजार रुपये काढून फरीनला दिले. ठरल्याप्रमाणे आदित्य त्याच्या मित्रासोबत महाविद्यालायमध्ये गेला. तिथे त्याला फेरीन भेटला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी फरीन त्यांना सातव्या मजल्यावर घेऊन गेला. प्राध्यापकांशी बोलून पाच मिनिटांत येतो असे सांगून फेरीन निघून गेला. मात्र दोन तास उलटल्या नंतरही तो परत आला नाही. त्याचा मोबाइलही बंद असल्याचे आदित्यच्या  लक्षात  आले. त्यामुळे ते दोघेही हॉटेलवर आले. मात्र फेरीन त्याचे सामान घेऊन हॉटेलमधून निघून गेल्याचे त्यांना समजले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर तो काही वेळापूर्वीच हॉटेलमधून निघून गेल्याचे त्यांना समजले. नोंदणीमध्ये त्याने त्याचा पत्ता सुरत, गुजरात असा दिला होता. फसवणूक झाल्याचे  लक्षता येताच आदित्यने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. आदित्यने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फेरीनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला. अखेर सहा महिन्यांनी फरीनला अटक करण्यात जुहू पोलिसांना यश आले.